नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस उपनिरीक्षक पद प्राप्त झाल्यानंतर तुमची जबाबदारी वाढली आहे. त्या जबाबदारीचे वहन करताना अत्यंत बारकाईने निरीक्षणाची गरज आहे, असे सांगत पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलातील 14 पोलीस अंमलदारांना आज कार्यमुक्त केले. हे सर्व पोलीस उपनिरीक्षक झालेले पोलीस अंमलदार आता प्रशिक्षणासाठी जाणार आहेत.
आज पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात नांदेड जिल्ह्यातून पोलीस उपनिरीक्षक पदाची विभागीय परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस अकादमी नाशिक येथे प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या पोलीस अंमलदारांसमक्ष प्रमोदकुमार शेवाळे बोलत होते. व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे गृह पोलीस उपअधीक्षक विकास तोटावार यांचीही उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलताना प्रमोदकुमार शेवाळे म्हणाले, आजपर्यंत तुमच्याकडे असलेल्या अधिकारांमध्ये वाढ होणार आहे. त्यासोबत तुमची जबाबदारी पण वाढणार आहे. आपल्या अधिकारांचा उपयोग करताना आपल्यातील निरीक्षण क्षमतेमध्ये वाढ करा आणि खऱ्या माणसाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करा. फौजदारी प्रक्रिया संहितेने आम्हाला काम करताना भरपूर अधिकार दिलेले आहेत. तेव्हा कोणत्याही दबावाला बळी न पडता अत्यंत काटेकोरपणे कायद्याचा अंमल करण्यासाठी प्रयत्न करा, जेणे करून पोलिसांचा विश्वास वाढेल.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे म्हणाले, आपल्या जीवनातील तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा एक बदल घडतो आहे. हा बदल स्वीकार करताना अत्यंत दक्ष राहण्याची गरज आहे. नाही तर अनेक समस्या तयार होतात. या समस्यांपासून वाचण्यासाठी आपल्यालाल कळत नसेल तर शेजाऱ्याला विचारणे योग्य असते अशी समज दिली.
दोन्ही अधिकाऱ्यांनी निवड झालेले पोलीस अंमलदार विकास अंकुश तिडके, अशोक काशीराम हाटकर, मारोती गंगाधर जिंगीलवाड (नेमणुक पोलीस मुख्यालय), देवानंद ग्यानोबा मोरे, बालाप्रसाद श्रीरंग टेकाळे (पोलीस ठाणे, वजिराबाद), धनाजी रामराव मारकवाड (पोलीस ठाणे, मनाठा), जगन्नाथ मुरलीधरराव शेरकर, माधव उत्तमराव गुंडेकर (पोलीस ठाणे, नांदेड ग्रामीण), विलास रामचंद्र गोरे (शहर वाहतुक शाखा इतवारा), राम नामदेवराव बारोळे (पोलीस ठाणे, रामतीर्थ), मीरा दादाराव सावंत (पोलीस ठाणे, इतवारा), सतिष माणिकराव टेंगे (पोलीस ठाणे, विमानतळ), भगवान कुंडलीकराव मोरे (पोलीस ठाणे, हदगाव) असे आहे. या सर्वांना पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, गृह पोलीस उपअधीक्षक विकास तोटावार यांनी भविष्यातील जीवनासाठी शुभकामना देऊन आज नांदेड जिल्हा पोलीस दलातून प्रशिक्षणाला नाशिक येथे जाण्यासाठी कार्यमुक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस कल्याण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी नियोजनबद्ध केले होते.
