

नांदेड,(प्रतिनिधी)- सिडको ते वाघाला रस्त्यावर सकाळी ५ वाजता सापडलेला युवकाचा मृतदेह बाजीराव पंडितराव हंबर्डे यांचा आहे.आ.मोहन हंबर्डे त्या ठिकाणी आले पण नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तेथे हजर नव्हते.मृतदेहाच्या गळ्यावर दोरीचे व्रण दिसत आहे.
आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास सिडको वाघाळा रस्त्यावर एक दुचाकी गाडी क्रमांक एमएच २६ बीजी ७५४३ आडवी पडलेली होती.त्या शेजारी एक ३५ वर्षीय माणसाचा मृतदेह पडलेला होता.नांदेड ग्रामीणच्या रात्री कर्तव्यावर असलेले अधिकारी आणि पोलीस अंमलदार तेथे पोहचले. गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी ऑन लाईन माहिती काढली तेव्हा मृतदेह बाजीराव पंडितराव हंबर्डे यांचा असल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्या नातलगांना बोलावण्यात आले.सकाळी ८ वाजेच्या सुमारास आ.मोहन हंबर्डे तेथे आले.त्यांनी स्वतः मृतदेहाच्या गळ्यावर असलेल्या दोरीच्या व्रणाची पाहणी केली.तो पर्यंत नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड तेथे आले नव्हते.
बाजीराव हंबर्डे हे आ.मोहन हंबर्डे यांचे निकटवर्तीय आहेत.विष्णुपुरी येथे त्यांची सिमेंटची दुकान आहे.विष्णुपुरी गावातील राजकारणावर त्यांची चांगलीच पकड होती.काय झाले,कसे झाले हे अद्याप कळलेले नाही.वैदयकीय अहवाल आल्यांनतर बरेच काही स्पष्ट होईल.पण बाजीराव हंबर्डे यांचा मृत्यू संशयास्पद नक्कीच आहे.