शहरात मटका जुगारावर आमचे नियंत्रण आहे आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो असे सांगून पोलीस कार्यवाही केल्याचे दाखवले जाते पण प्रत्यक्षात तसे असते काय? याचा शोध घेतला तेंव्हा शहरातील नई अबादी परिसरात अत्यंत जोरदारपणे थाटलेले दुकान दिसले. या ठिकाणी आकड्यांचे बॅनर लावून दोन वेगवेगळ्या डायर्या ठेवून त्यावर मटक्याचे आकडे लिहणारा माणुस दिसला. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला हा मटका जुगार अड्डा किती जोरदारपणे सुरू आहे असे दिसते. एकूणच मटका जुगार अगोदरही कधी बंद नव्हता आजही बंद नाही आणि पुढेही बंद होणार नाही अशीच परिस्थिती दिसते. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशी एकच नव्हे तर १७ मटक्यांची दुकाने आहेत. देव त्या सर्वांचे भले करो ज्यांनी हा मटका जुगार राजरोसपणे चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. ही परवानगी लिखित स्वरुपात असते की, तोंडी स्वरुपात असते याचा सुध्दा शोध घेतला पण ते कांही स्पष्ट झाले नाही.
नांदेड जिल्ह्यातील मोठे पोलीस अधिकारी मी मोठा की तु मोठा या भांडणातच गर्क आहेत. एक दुसर्याचा काटा काढून आपल्या कांही करवल्यांसमोर मी किती छान कागदपत्रे बनवली हे सांगून आसुरी आनंद व्यक्त करण्यात त्यांना जो आनंद मिळतो तो आनंद सुध्दा कोणी हिरावून घेवू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.