नांदेड (प्रतिनिधी)-विष्णुपूरी येथील बाजीराव हंबर्डे यांचा खून झाला आहे. त्यांचे बंधू प्रविण हंबर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ज्या ठिकाणी बाजीरावांचा मृतदेह सापडला. तेथे जवळच असलेल्या एका घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यंाचा खून झाल्याची घटना चित्रीत झाली आहे.
आज सकाळी 5 वाजेच्यासुमारास सिडको-वाघाळा रस्त्यावर मोटारसायकल क्रमांक एम.एच.26 बी.जी.7543 आडवी पडलेली होती. त्याजवळच एक मृतदेह होता. मरणारा माणुस 35 वर्षाचा आहे असे दिसत होते. गाडीच्या नंबरवरुन पोलीसांनी माहिती घेतली तेंव्हा ते बाजीराव पंडीतराव हंबर्डे हे आहेत कळले. घटनासमोर आल्यानंतर सकाळी 8 वाजता आमदार मोहनराव हंबर्डे घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आपला राग व्यक्त करतांना ज्याला सांगणे गरजेचे आहे त्याला सांगितले.
घटनेची माहिती व्हायरल होताच अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. प्राप्त माहितीनुसार बाजीराव हंबर्डे यांचा मृतदेह ज्या ठिकाणी पडलेला होता. त्यापासून 100 मिटर अंतरावर असलेल्या एका घराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाजीराव हंबर्डेचा खून झाल्याची घटना रेकॉर्ड झाली आहे. त्यानुसार 17 जूनच्या मध्यरात्रीनंतर 12.45 ते 1 वाजेदरम्यान त्या ठिकाणी मोटारसायकलवर कांही जण आले, आपसात बोलत उभे होते आणि नंतर चार जणांनी बाजीराव हंबर्डेे यांचा गळा आवळून त्यांचा खून केला आहे. ही घटना त्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोेरे यांनी बाजीराव हंबर्डे यांचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांना लवकरच गजाआड करू असा विश्र्वास व्यक्त केला.
दुपारनंतर प्रविण पंडीतराव हंबर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जून रोजी दुपारी 4 वाजल्यापासून बाजीराव हंबर्डे यांचा पत्ता लागला नाही. सायंकाळी 6 वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद होता. त्यानंतर आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेत कोणी तरी अज्ञात माणसांनी, अज्ञात कारणासाठी बाजीराव हंबर्डे यांचा गळा आवळून खून केला आहे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी असा अर्ज दिला आहे. त्यानुसार मारेकऱ्यांविरुध्द गुन्हा क्रमांक 392/2021 दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास अत्यंत कर्तव्यदक्ष, कर्दनकाळ,सक्षम,चपळ पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांच्याकडे देण्यात आला आहे.
