8 चोरीच्या प्रकारांमध्ये 5 लाख 8 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी झाली आहे. त्यात 1 लाख 74 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. तसेच 35 हजार रुपयांचे साहित्य तोडफोड करण्यात आले आहे. किनवट येथे पोलीस उपनिरिक्षकाचे घरफोडण्यात आले आहे. श्रध्दा कॉलनी छत्रपतीनगर नांदेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 30 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. लाईफ केअर हॉस्पीटल शिवाजीनगरमध्ये चोरी झाली आहे. सोमेश कॉलनी वजिराबाद, माहुर येथे दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. गणेशनगर भागातून एक महागडी सायकल चोरीला गेली आहे आणि आलेगाव येथून दोन गायी चोरून नेण्यात आल्या आहेत. सर्व आठ चोरी प्रकारामध्ये एकूण 5 लाख 8 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
वाजेगाव परिसरातील एक दुकान फोडून चोरट्यांनी त्यातील 1 लाख 74 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच अनेक साहित्य फोडून 35 हजारांचे नुकसान केले आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे अधिक तपास करीत आहेत.
सिध्दार्थ गणपत थोरात यांच्या छत्रपती चौकाजवळील श्रध्दा कॉलनीचे घर बंद होते. या घरासाठी वाचमन होता. 17 मे सकाळी 10 ते 16 जूनच्या रात्री 8 वाजे दरम्यान त्यांचे घरफोडून चोरट्यांनी 4 तोळे सोन्याचे दागिणे, 1 लाख 20 हजार रुपयांचे आणि 10 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 30 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक आश्रुबा घाटे अधिक तपास करीत आहेत.
किनवट येथील एस.व्ही.एम.कॉलनीमध्ये राहणारे पोलीस उपनिरिक्षक राजू अशोक मोरे यांचे घर बंद करून ते 10 जून रोजी लग्न कार्यासाठी बाहेर गावी गेले होते. 11 जून रोजी परत आले तेंव्हा त्यांचे घर फोडलेले होते. घरातून 3 ते 4 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कोलबुध्दे अधिक तपास करीत आहेत.
आनंदा नाथा जोंधळे हे लाईफ केअर सेंटर हॉस्पीटल येेथे आपल्या मुलीच्या उपचारासाठी आले होते. 16 जूनच्या पहाटे 4 ते 6 वाजेदरम्यान त्यांच्या जवळील बॅगमध्ये असलेले सोन्या-चांदीचे दागिणे, मोबाईल आणि रोख रक्कम असा 40 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार तपास करीत आहेत.
सुदर्शन सखाराम अप्पा एकशिंगे यांनी 15 जून रोजी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.21 ए.वाय.ही 40 हजार रुपये किंमतीची गाडी सोमेश कॉलनी नांदेड येथे उभी केली होती. 16 जूनच्या पहाटे 6 वाजता ही गाडी चोरीला गेल्याचे दिसले. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गौस अधिक तपास करीत आहेत.
माहुर येथील सुरेश नामदेव गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माहुर येथील प्रतिक कोकुलवार यांच्या घरासमोर त्यांनी उभी केलेली त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.29 बी.आर.5752 ही 40 हजार रुपये किंमतीची गाडी 14 जूनच्या सकाळी 10 वाजता चोरीला गेल्याचे दिसले. माहुर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार आडे अधिक तपास करीत आहेत.
नांदेडच्या गणेशनगर भागातून अभिजित चंद्रकांत गव्हाणे यांची महागडी 30 हजार रुपये किंमतीची सायकल 13 जूनच्या सकाळी 7 ते दुपारी 12.30 वाजेदरम्यान त्यांच्या घराच्या अंगणातून चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी या सायकल चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
गंगाधर बाबूराव पाटील रा.आलेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जूनच्या सायंकाळी 6 ते 11 जूनच्या पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांच्या शेताच्या आखाड्यावर बांधलेल्या 50 हजार रुपये किंमतीच्या दोन गायी चोरीला गेल्या आहेत. लिंबगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार अशोक दामोदर अधिक तपास करीत आहेत.
