नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर येथे जादुटोण्याच्या माध्यमातून गुप्तधन काढण्याच्या तयारीत असणाऱ्या लोकांविरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्यातील चार आरोपींना आज लोहा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एम. गायकवाड यांनी दोन दिवस न्यायालयीन कोठडीत पाठविले असून त्यांच्या जामीन अर्जावर 18 जून रोजी सुनावणी होणार आहे.
योगेश बालासाहेब हंबर्डे रा.वाका ता.लोहा यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या वाका येथील जमीनीत 12 जूनच्या मध्यरात्री 3 वाजता कांही लोक जमले होते. त्यांना विचारणा केली असता आम्ही महाराज लोक आहोत तुमच्या शेतातून गुप्त धन काढत आहोत असे सांगितले. कोणाला विचारून गुप्तधन काढता अशी विचारणा करून योगेश हंबर्डे यांनी केल्यानंतर ते सर्व लोक पळून जावू लागले त्यावेळी तेथील दोघांना योगेश हंबर्डे, त्यांचा भाऊ आणि शेजारी विश्र्वनाथ मोरे यांनी पाठलाग करून दोघांना पकडले आणि या बाबत तक्रार दिली. हे शेत गट क्रमांक 258 आहे.
याबाबत उस्माननगरचे पोलीस निरिक्षक दिरप्पा भुसनुर यांनी शिवानंद उर्फ गजानन मारोती कोमटवार (35) रा.राहेर ता.नायगाव, तिरुपती दिगंबर नरवाडे (21) रा.राहेर, धर्मसिंह मोहनसिंह जाधव (22) रा.पुर्णा, सौ.वैशाली सिध्दार्थ गायकवाड रा.पुर्णा अशा चार जणांना अटक केली. या सर्व लोकांना 16 जून 2021 पर्यंत लोहा न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले होते. आज पोलीस कोठडी संपल्यावर उस्माननगर पोलीसांनी यांना न्यायालयीन कोठडीत घेण्याची विनंती केली. याप्रकरणातात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादुटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 1013 तिल कलम 3 (1) जोडण्यात आले आहे. या गुन्ह्याचा क्रमांक 105/2021 असा आहे.
लोहा येथील सरकारी वकील ऍड. गिरीश मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 16 जून रोजी या सर्व आरोपींनी जामीन देण्याची विनंती करणारा अर्ज न्यायालयात सादर केला होता. न्यायाधीश व्ही.एम. गायकवाड यांनी त्यावर पोलीसांचे काय म्हणणे आहे हे विचारण्याचा आदेश केला. त्यानुसार या सर्व जादुटोणा प्रकरणातील लोकांना तुरूंगात पाठवून दिले आहे. या प्रकरणाची जामीन देण्यासाठीची सुनावणी 18 जून रोजी होणार आहे.