नांदेड (प्रतिनिधी)- गुरूद्वारा बोर्ड सदस्य परमज्योतसिंघ चाहेल हे गुरूद्वारा बोर्ड कायद्यानुसार त्या पदावर राहण्यास अपात्र असल्याने त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी करणारे पत्र नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वनविभागाचे मुख्यसचिव यांना स. जगदीपसिंघ नंबरदार यांनी पाठविले आहे.
नांदेड शहरातील गुरूद्वारा बोर्डात परमज्योतसिंघ चाहेल हे एक सदस्य आहेत. दि. 3 एप्रिल 2019 च्या राजपत्रानुसार परमज्योतसिंघ अर्जुनसिंघ चाहेल यांची नियुक्ती गुरूद्वारा बोर्डाच्या सचिव पदावर झाली आहे. गुरूद्वारा बोर्डात सदस्य होण्यापुर्वी परमज्योतसिंघ चाहेल न्यायालयात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या पदावर कार्यरत होते. जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे यांच्याकडून माहितीच्या अधिकारात दि. 7 ऑक्टोबर 2020 रोजी ठाणे न्यायालयातून निर्गमीत करण्यात आलेल्या पत्रानुसार परमज्योतसिंघ चाहेल यांना ठाणे येथून 14 फेब्रुवारी 2013 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सक्तीने सेवानिवृत्त केले आहे.
गुरूद्वारा बोर्ड कायदा 1956 नुसार बोर्डाचे कामकाज चालते. या कायद्यात कलम 7 (एफ) मध्ये असे नमुद आहे की, एखाद्या व्यक्तीला यापुर्वी त्याच्या पदावरून गैरप्रकार आणि लाच यासाठी पदमुक्त केले असेल तर अशी व्यक्ती गुरूद्वारा बोर्ड सदस्य या पदावर काम करण्यास अपात्र आहे. या कायद्यानुसार गुरूद्वारा बोर्डात सुद्धा गैरप्रकार होऊ नये तसेच कायद्याच्या तरतुदीप्रमाणे परमज्योतसिंघ चाहेल हे गुरूद्वारा बोर्ड सदस्य म्हणून अपात्र आहेत. त्यामुळे त्यांची दि. 8 मार्च 2019 रोजी राजपत्र क्र. 81 नुसार गुरूद्वारा बोर्ड सदस्य या पदावर झालेली नियुक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी स. जगदीपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी केली आहे. या अर्जाची पत्र जिल्हाधिकारी नांदेड, गुरूद्वारा बोर्ड अध्यक्ष यांनाही देण्यात आली आहे.