नांदेड(प्रतिनिधी)-15 जून रोजी एनआयए विशेष न्यायालय मुंबईने नांदेड येथील तीन युवकांना दहा वर्षाची शिक्षा ठोठावली. याप्रकरणात दोन जणांना न्यायालयाने पुराव्या अभावी मुक्त केले. या गुन्ह्यात अद्यापही चार आरोपी फरार घोषीत आहेत. त्यातील दोन सौदी अरेबीया आणि एक हैद्राबाद आणि एक बेंगलुरू येथील आहे. या सर्वांनी हैद्राबाद येथील आ.राजासिंह ठाकूर, बेंगलुरू येथील वृत्तपत्र मालक विजय सेंख्येश्र्वर, पत्रकार विश्वेश्र्वर भट, प्रताप सिंन्हा आणि परभणी, जालना येथे बॉम्बस्फोट प्रकरणातून न्यायालयाने सोडलेले आरोपी यांचा खून करण्यासाठी कट रचला होता. या सर्व प्रकारणाचे धागेदोरे सन 1997 मध्ये धर्माबाद येथे झालेला बॉम्बस्फोट आणि त्यास कारणीभुत असलेली संघटना इंडियन मुस्लिम मोहम्मदीन मुजाहिद्दीन(आयएमएमएम) ही आहे. आयएमएमएमचा म्होरक्या आझम घौरी यास तत्कालीन आंध्र प्रदेश पोलीसांनी चकमकीत ठार केले होते.
दि.31 ऑगस्ट 2012 रोजी नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार नांदेडमध्ये कांही जण हिंदु नेते, पोलीस अधिकारी, पत्रकार यांचा खून करण्यासाठी कट रचत आहेत. सोबतच जालना आणि परभणी येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील न्यायालयातून मुक्त झालेल्या आरोपींना ठार मारण्याचा बेत आखत होते. त्यानुसार पोलीसांनी मोहम्मद अकरम मोहम्मद अकबर यास पकडले. त्यानंतर चाचपणी झाली आणि पुढे पोलीसांनी मोहम्मद मुजमील अब्दुल गणी, मोहम्मद साजिद मोहम्मद फारुख, मोहम्मद इरफान मोहम्मद गौस, मोहम्मद ईलियास मोहम्मद अकबर अशा पाच जणांना पकडले. या बाबत मुंबईच्या काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 10/2012 दाखल झाला. या लोकांकडून दोन बंदुका आणि 14 गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. सोबतच अनेक कागदपत्र पोलीसांनी जप्त केली होती. भारतीय हत्यार कायदा आणि बेकायदेशीर हालचालीस प्रतिबंध 1967 आणि सुधारीत 2008 च्या कलम 20 आणि 38 नुसार या गुन्ह्याची सुरूवात झाली. नांदेडच्या एटीएस पथकातील पोलीस उपअधिक्षक सुधाकर रेड्डी, त्यानंतर माणिक बेद्रे यांनी या सर्व प्रकरणाचा तपास केला. या सर्व प्रकरणाची कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी पोलीस अंमलदार दिलीप जाधव यांनी पार पाडली होती. एटीएस पथकाने या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर या बाबतचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने घेतला. त्यांनी विदेशातील बाबींबाबत महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केले. ज्यामध्ये सौदी अरेबीया येथील सिद्दीकबीन उस्मान उर्फ अब्बु हजला उर्फ अब्दुल बारी, हैद्राबाद येथील अब्दुल माजिद,बेंगलुरू येथील उमर उर्फ झाकीर उर्फ उस्ताद आणि फुरकान उर्फ अफजल उर्फ अकबर रा.सौदीअरेबीया यांचा सहभाग याकटासाठी कसा होता. याची मांडणी न्यायालयात केली.
या अगोदर या घटनाक्रमातील ईतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. सन 1997 मध्ये धर्माबाद येथे एक बॉम्बस्फोट झाला. त्याबाबत तो गॅस सिलेंडरचा स्फोट होता असा त्या बॉम्बस्फोटावर पुर्णविराम लागला. त्यानंतर सन 2000 मध्ये नांदेडच्या शारदा टॉकीजमध्ये बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी नांदेडचे पोलीस अधिक्षक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण होते. शारदा टॉकीज बॉम्बस्फोटाची सखोल तपासणी झाली त्यात तो बॉम्बस्फोट आयईडी या घातक आणि स्फोटक पदार्थाने घडविण्यात आला होता ही बाब स्पष्ट झाली. असेच बॉम्बस्फोट आंध्र प्रदेश येथील लांबा चित्रपटगृह आणि व्यंकटेश चित्रपटगृह येथे झाले होते. या तिन्ही चित्रपटगृहांमध्ये सेंन्सार बोर्डाचे वयस्कांसाठीचे चित्रपट दाखवले जायचे. अशी या चित्रपटगृहांची ख्याती होती. त्योवळी धर्माबाद, हैद्राबाद, बोधन येथून जवळपास 15 जणांना पकडण्यात आले होते. त्यातील एक धर्माबादचा मकबुल याने हैद्राबाद, निजामबाद येथे सुध्दा खून केले होते. त्या प्रकरणातून सुटका झाल्यानंतर मकबुल सध्या एनआयएने दिल्लीतील एका गुन्यात अटक केली होती. त्याचे पुढे काय झाले हे माहित नाही.
आझम घौरी नावाचा व्यक्ती हा मुळ रा.आंध्र प्रदेशचा त्याने अनेक प्रतिबंध असलेल्या संघटनांमध्ये काम केले होते आणि नंतर स्वत:ची आयएमएमएम नावाची संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून भारतीय समाजावर होणारा पाश्च्यात्य परिणाम त्यांना बंद करायचा होता. पण त्यासाठी त्यांनी मार्ग चुकीचा निवडला. पुढे आझम घौरी आंध्र प्रदेशच्या एका टास्कफोर्सने चकमकीत मारुन टाकला. या घटनेनंतर नांदेडचा मोहम्मद अकरम मोहम्मद अकबर हा सौदी अरेबीयाला नोकरी शोधण्यासाठी गेला आणि तेथे तो लष्कर-ए-तैयबा या संघटनेच्या संपर्कात आला आणि आझम घौरीला भारतीय प्रशासनाने मारले, त्यासाठी लिखाण करणारे वृत्तपत्र मालक विजय संकेश्र्वर, पत्रकार विश्र्वेश्वर भट आणि प्रताप सिन्हा यांचा खून करण्याची सुपारी घेवून तो परत नांदेडला आला आणि त्याने येथे तयारी केली असा अभिलेख एटीएसने तयार केला होता. सोबतच परभणी आणि जालना या ठिकाणी झालेल्या दोन बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ज्यांची न्यायालयाने सुटका केली होती. ज्यात मारोती वाघ, संजय चौधरी यांचा पण खून करायचा होता. सन 2006 मध्ये नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये एका घरात बॉम्बस्फोट झाला होता. त्यात शंतनु नावाचा एक युवक मरण पावला होता आणि इतर जण जखमी झाले होते. त्यावेळी नांदेडचे पोलीस अधिक्षक फत्तेसिंह पाटील हे होते. त्याप्रकरणात सुध्दा अनेकांना त्रास झाला होता.
मोहम्मद अकबर आणि त्याचे साथीदार खलबत रचून खून करण्याअगोदरच एटीएस पथकाने त्याना जेरबंद केले होते. त्यामुळे अनर्थ घडला नाही. ही मंडळी ज्यांचा खून करायचा आहे. त्यांची रोजची बैठक, जाण्या-येण्याचा मार्ग, रोजचे कामकाज याचा अभ्यास करत होती आणि त्यानंतर खून करण्याचा दिवस निश्चित होणार होता. ई मेलवर ड्राफ्ट बॉक्समध्ये संदेश लिहिले जायचे आणि ते वाचल्यावर ड्राफ्ट बॉक्समधील संदेश कायमचा रद्द करायचा अशा पध्दतीने हे खलबत रचले गेले होते. सुदैवाने या प्रकरणात कोणाचा जीव मात्र गेला नव्हता. पण बेकायदेशीर हालचाली करून एकमेकास सुचना देणे, सहाय्य करणे, एक दुसऱ्याला उद्युक्त करणे, गुन्हेगारी कट रचने आदी काम यांनी केले होते.
तब्बल 9 वर्ष एनआयए न्यायालयात चाललेल्या या खटल्याचा निकाल 15 जून 2021 रोजी आला. ज्यामध्ये विशेष न्यायाधीश डी.ई.कोठाळीकर यांनी तीन जणांना दहा वर्ष सक्तमुजरी अशी शिक्षा ठोठावली पण दोन जणंाची सुटका पुराव्या अभावी केली. भारतीय कायद्याच्या संकेतानुसार ही सर्व मंडळी अटकेपासून आजपर्यंत जेलमध्येच होती म्हणून त्यांना शिक्षेतून ते दिवस वगळून मिळतील. म्हणजे ते नांदेडला येतील. जवळपास 9 वर्ष तुरूंगात राहिल्याने आता कायद्याच्या दृष्टीकोणातून त्यांनी ही विद्यावाचस्पती प्राप्त केली असणारच तेंव्हा या पुढील कालखंडात त्यांच्या जीवनात झालेल्या चुकीच्या मार्गांना सोडून त्यांनी आपले पुढील जीवन सत्कारणी लावावे या अपेक्षेतूनच हा शब्द प्रपंच.