नांदेड(प्रतिनिधी)-15 जूनच्या पहाटे सुर्योदयाचा उजेड पडताच इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी एका गाडीत गोवंश जातीची कालवड कापण्याच्या उद्देशाने नेतांना पकडले आहे. दोन व्यक्तींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत आणि तीन पळून गेले आहेत.
इतवारा गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गणपत कोंडजी पेदे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार देशमुख, गायकवाड, समीर अहमद हे गस्त करत असतांना 15 जुलैच्या पहाटे 6 वाजता संशयीतरित्या गावात आलेली एक चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.04 बी.आर.0163 थांबवली. या गाडीमध्ये एक गोवंशाची लालसर रंगाची शिंग नसलेली अंदाजे 9 महिन्याच्या वयाची कालवड होती. पोलीस पथकाने सापडलेल्या लोकांना त्यांची नावे विचारली असता मोहम्मद अहेमद मोहम्मद कुरेशी (43) रा.मदीनानगर देगलूरनाका नांदेड, शेख आवेज शेख हैदर (27) रा.मिल्लतनगर नांदेड अशी आहेत.पळून गेलेल्या माणसांची नावे ताहेर रा.मिल्लतनगर, आरीफ रा.उमर कॉलनी आणि एक अनोळखी माणुस हे गल्लीबोळातून पळून गेले.
गणपत पेदेे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही गोवंश जातीची कालवड कत्तल करून विक्री करण्यासाठी घेवून जात होते म्हणून त्यांच्याविरुध्द तक्रार देण्यात आलेली आहे. 1 लाख रुपये किंमतीची चार चाकी गाडी आणि 10 हजार रुपयांची गोवंश कालवड पोलीसंानी पकडली आहे. गणपत पेदे यांच्या तक्रारीवरुन पाच जणांविरुध्द प्राण्यांना कु्ररतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 च्या कलम 11(1)(5)(ई) आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 च्या कलम 5(अ)(ब)आणि 9, 11 या कलमानुसार गुन्हा क्रमांक 130/2021 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके यांच्याकडे देण्यात आला आहे.
