अंकूश शिंदे
हदगाव-शासन मान्यता प्राप्त नसलेले बनावट बियाणे विक्री करणाऱ्या दोन जणांविरुध्द तामसा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पंचायत समिती हदगाव येथील कृषी अधिकारी प्रल्हाद महादु जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तळेगाव फाटा येथे बनावट बियाण्यांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपासणी केली असता तेथे ग्रो हनी 4 जी असे लिहिलेले बंद पाकीट सापडले असे एकूण 30 पॉकीट होते. याची किंमत 30 हजार रुपये लिहिण्यात आली आहे. या उत्पादनावर कोणतीही शासन मान्यता देण्यात आलेली नाही.
या तक्रारीनुसार तामसा पोलीसांनी भारतीय दंड संहितेतील कलम 420, बियाणे नियंत्रण आदेश 1983 च्या कलम 3 (1), बियाणे कायदा 1966 कलम 19, महाराष्ट्र कापुस बियाणे अधिनियम कलम 10 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 15 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 आणि 7 नुसार गुन्हा क्रमांक 107/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्यात आरोपीच्या रकान्यात काशीनाथ विश्वनाथ कंठीले रा.अहमदनगर आणि मारोती नागोराव पवार रा.शिवणी ता.हदगाव जि.नांदेड यांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक एल.व्ही.राख हे यांच्याकडे देण्यात आला आहे.