विशेष

आजपासून जिल्हयातील सर्व शाळा सुरू, मुलांचे ऑनलाईन व गृहभेटीच्या माध्यमातून शिक्षण; शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची शाळेत पूर्णवेळ उपस्थिती

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची माहिती

नांदेड(प्रतिनिधी)- आज मंगळवार दिनांक 15 जून पासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होत आहेत. शाळेतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलावण्यास सध्या सूचना नाहीत त्यामुळे शाळेत विद्यार्थी येणार नाहीत. परंतु सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्‍तर कर्मचारी यांनी शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्या त्या इयत्तांची पाठ्य पुस्तके उपलब्ध होतील व त्यांचे ऑनलाइन माध्यमातून तसेच गृहभेटीच्या माध्यमातून स्वाध्याय व उपक्रमव्‍दारे शिक्षण सुरु ठेवावेत. तसेच दूरदर्शनच्या माध्यमातून सर्व वर्गांच्या अध्यापनासाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. त्यानुसार विद्यार्थी हे कार्यक्रम पाहतील व अभ्यासक्रम पूर्ण करतील यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत.

माझी शाळा सुंदर शाळा, वृक्षारोपण यासह शालेय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या त्या विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त होईल, याची दक्षता शिक्षकांनी घ्यावयाची आहे. तसेच गोष्टींचा शनिवार या उपक्रमातून वाचनासाठी विद्यार्थ्‍यांना एक तास वाचनकट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचे काम या काळात शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे. कोविड-19 मुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे झालेले नुकसान भरून करण्यासाठी गाव पातळीवर शिक्षक मित्र व पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील यासाठी विशेष प्रयत्न करण्‍याच्‍या सूचनाही मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्‍या आहेत.

नांदेड जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या एकूण 3 हजार 731 शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदे मार्फत चालविल्या जाणाऱ्या 2 हजार 198 शाळा आहेत. या शाळांमधून शिक्षण देणारे 24 हजार 468 शिक्षक तर  6 लाख 95 हजार 121 विद्यार्थी आहेत. यात जिल्हा परिषदेचे 9 हजार 223 शिक्षक तर 2 लाख 6 हजार 169 विद्यार्थी आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.