पोलीसांनी मोबाईल वापरू नये काय?
पोलीसांना माहिती देणारी सर्वात मोठी यंत्रणा गुन्हेगारच
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोबाईल सीडीआर तपासायला हवे का?
खातय कोण आणि उगळतय कोण?
ज्याने केले त्यालाच भरायवे लागते
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात मागील कांही महिन्यांपासून पोलीस दलात विविध घटना घडत आहेत. कोण बॉस हेच कळायला मार्ग नाही. पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी याला कंटाळले आहेत. त्यामुळे पोलीस दलात निराशेची भावना जागृत होत आहे. पण कर नाही त्याला डर नाही या उक्तीप्रमाणे नांदेड जिल्हा पोलीस दलातील टार्गेट केले जाणारे अधिकारी आणि पोलीस अंमलदार अत्यंत दमदारपणे जिवन जगतील या आशेनेच आम्ही लेखणी झिजवत आहोत.
नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात 29 मार्च रोजी तीन गुन्हे दाखल झाले. ज्यामध्ये एका गुन्ह्याचा क्रमांक 114/2021 असा आहे. या गुन्ह्याच्या प्राथमिकीमध्ये 63 जणांची नावे आहेत. त्यानंतर 200 जणांची लिस्ट तयार केली असा कांगावा तयार करण्यात आला. त्यानंतर 200 जणांची लिस्ट गाळून 146 जणांची लिस्ट तयार झाली आणि हे 146 जण पकडायचे आहेत असा देखावा आणला गेला. हा देखावा आणल्यागेल्यामुळे अनेकांनी नांदेडची वाट सोडून इतर राज्यांमध्ये आसरा घेतला. आजमितीस या गुन्ह्याच्या संदर्भाने 27 जण पकडण्यात आले आहेत. 146 मधील 27 म्हणजे हा भाग टक्केवारीत मोजला तर 25 टक्केपर्यंतच होतो. गुन्हा घडून आज 77 दिवस झाले आहेत. पण 77 आरोपी सुध्दा पकडण्यात आलेले नाहीत. या गुन्ह्याच्या तपासासाठी एक मोठी समिती स्थापन करण्यात आली आहे. पण या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार हे पोलीस निरिक्षकच आहेत.
दि.21 मे रोजी जांभरून पाटीजवळच्या कॅनाल शेजारी अब्दुल जब्बार मोहम्मद नजीर (35) या ट्रक मेकॅनीकचा मृतदेह सापडला. त्याच्या शरिरावर असंख्य जखमा होत्या. या संदर्भाने अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 122/2021 दाखल झाला. त्यात हरप्रितसिंघ मेजर, मजहर खान, सुशांत भुजबळे, शेख वसीम यांच्या नावासह तक्रार देण्यात आली होती. त्यात 21 मे रोजीच शेख अब्दुल शेख लतिफ अर्धापूर पोलीसांनी पकडला. नंतरचे 4 हे 25 मे रोजी नाट्यमय रित्या अर्धापूर पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनाही अटक झाली. या नाट्यमय प्रकारात कटपुतळीच्या दोऱ्या कोणाच्या बोटात होत्या? हाच विषय सर्वात मोठा आहे. असो अर्धापूरचा गुन्हा अर्धापूर पोलीस पाहतील.
25 मे रोजीच नांदेडच्या वजिराबाद पोलीसांना रणदिपसिंघ ईश्र्वरसिंघ सरदार याला पकडण्याचे अत्यंत गुप्त आदेश झाले. हे आदेश कोठून निर्गमित झाले. याचा काही थांगपत्ता काही निवडक लोक वगळता कोणालाच लागला नाही. पण पोलीस दलाच्या बाहेरील व्यक्तींना याचा सुगावा लागलेला आहे. वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सोमनाथ शिंदे यांना रणदिपसिंघला पकडण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस दलातील तोंड दाबून बुक्यांचा मार ही म्हण आजही जशी आहे तशीच वापरली जाते. वजिराबाद पोलीसांनी भरपूर शोध घेतला. पण पोलीस ठाण्यात आलेला रणदिपसिंघ सापडला नाही. 26 मे रोजी सोमनाथ शिंदे आणि पोलीस अंमलदार संजय जाधव यांना लेखी आदेश देण्यात आले. ज्यात आज सायंकाळपर्यंत रणदिपसिंघला पकडा नाही तर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी नियंत्रण कक्षात हजर व्हा असे त्या आदेशात लिहिलेले आहे. 26 मे रोजीच्या सायंकाळी 7 वाजेपर्यंत रणदिपसिंघ सापडला नाही आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ शिंदे 26 मेच्या सायंकाळपासून जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत आहेत. उरला पोलीस अंमलदार संजय जाधव तो तर वण-वण भटकत आहे.
या सर्व प्रकारानंतर कोणी तरी दोन व्यक्तीमध्ये फोनवर बोलणे झाले आणि ते बोलणे कोणत्या तरी मोठ्या पोलीस अधिकाऱ्यापर्यंत पोहचले आणि त्या बोलण्या नुसार सोमनाथ शिंदे आणि संजय जाधव विरुध्द चौकशी सुरू झाली आहे. त्यांच्यावर असा आरोप आहे. तुम्हीच रणदिपसिंघला पळवून लावले. गेल्या 77 दिवसांमध्ये गुन्हा क्रमांक 114/2021 मध्ये तपासाची कोणतीच प्रगती झाली नाही त्यात चमत्कार घडला आणि रणदिपसिंघ हा त्या गुन्ह्यातील आरोपी आहे असे जादूने माहित झाले. पण सांगतात ना पोलीस खाते करील तेच होईल. याही प्रकरणात असेच झाले. पण दुर्देव करतांना टार्गेट पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार झाला. करील ते होईल हे करतांना सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या आपल्या बौध वाक्याप्रमाणे पोलीस दलाने काम करायला हवे अशी अपेक्षा आहे.
एक खळबळजणक माहिती समजली आहे. ज्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ शिंदे आणि पोलीस अंमदार संजय जाधव यांचे मोबाईल सीडीआर मागवले आहेत म्हणे. त्यामुळे पोलीस अंमलदारांना आपण मोबाईल वापरायचे की, नाही हा प्रश्न पडला आहे. मोबाईल सीडीआर काढतांना त्यासाठी कोणत्या तरी गंभीर गुन्ह्याचा क्रमांक लिहावा लागतो. ज्याचे सीडीआर काढले आहे. त्याचा आरोपीशी संबंध जोडावा लागतो. ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करतांना भरपूर मेहनत लागते. हरकत नाही सोमनाथ शिंदे आणि पोलीस अंमलदार संजय जाधवचा मोबाईल सीडीआर मागवला असे पण वातानुकुलीत कक्षात बसून फक्त आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचे मोबाईल सीडीआर सुध्दा याच संदर्भाने तपासायला हवे जेणे करून अर्धापूरचा गुन्हा आणि नांदेडच्या वजिराबादचा गुन्हा याचा संबंध नक्कीच समोर येईल. पोलीसांना माहिती देण्यामध्ये सर्वात मोठा हात गुन्हेगारांचा असतो. त्यांच्याकडून माहिती जमा करून पोलीसांना आपल्या समोर असलेल्या गुन्ह्याची उकल करावी लागते. त्यामुळे पोलीसांच्या सीडीआरमध्ये अनेक गुन्हेगारांशी बोललेले अनेक प्रसंग असतात. तो त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. पण सध्याच्या परिस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या पोलीस दलामध्ये झारशाही सुरू झाली आहे. कांही दहा-वीस सुर्याजी पिसाळांमुळे संपुर्ण पोलीस दलाला वैताग आला आहे.
या सर्व प्रकारामध्ये पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी त्यांच्याकडे असलेल्या भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता, सेवानियमावली व शर्थी आणि माणुसकी जो या जीवनात सर्वात मोठा विषय आहे या सर्वांना अनुरूप चुकलेल्याला कधीच क्षमा न करता कोणता निरागस माणुस बळी जाणार नाही यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भिती कधीच मनात बाळगु नका कारण थव्यांनी उडणाऱ्या पक्षांपेक्षा गरुडाची झेप नेहमीच मोठी असते अशा पध्दतीचा संदेश आपल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना दिला तरच या जिल्ह्याच्या पोलीस दलाला काम करण्यात हुरूप येईल. नसता त्यांचे कामकाज कुलूप होईल.
