नांदेड(प्रतिनिधी)-हजुरी खालसा फायनान्सच्या मालकाने राजकीय बळाचा वापर करून माझ्याविरुध्द खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि अजून करण्यात येत आहेत. ही प्रवृत्ती मला आत्महत्येस प्रवृत्त करत आहे. या माझ्या मागील कटासाठी प्रविण पोकर्णा, अक्षय रावत, हरप्रितसिंघ मेजर, सतपालसिंघ खालसा आदी जबाबदार आहेत अशा आशयाचे एक निवेदन पोलीस अधिक्षक नांदेड यांच्यासह मुख्यमंत्री, मानव अधिकार आयोग, ना.अशोकराव चव्हाण, खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.मोहन हंबर्डे,आ.अमरनाथ राजूरकर, पोलीस महानिरिक्षक, जिल्हाधिकारी नांदेड, माजी आ.डी.पी.सावंत, पोलीस उपअधिक्षक शहर विभाग आणि पोलीस निरिक्षक वजिराबाद यांना रणदिपसिंघ ईश्र्वरसिंघ सरदार यांनी नोंदणीकृत डाकद्वारे पाठविले आहे.
नांदेड शहराच्या माता गुजरीजी कॉम्प्लेक्समध्ये हजुरी खालसा फायनान्स आहे. या फायनान्समध्ये प्रविण ओमप्रकाश पोकर्णा, अक्षय भानुसिंह रावत, हरप्रितसिंघ नरेंद्रसिंघ मेजर, सतपालसिंघ किशनसिंघ खालसा असे आम्ही पाच जणांनी मिळून तो व्यवसाय सुरू केला होता असे रणदिपसिंघ सरदारने लिहिले आहे. आपल्या आठ पानी अर्जामध्ये पाच भागिदारांचे काय-काय कामकाज होते, कोणाची काय जबाबदारी होती हे सुध्दा रणदिपसिंघने लिहिले आहे. त्यामध्ये राजकीय आणि पैशांची अडचण सांभाळण्याची जबाबदारी प्रविण पोकर्णा यांची, पोलीस ठाण्यात अर्ज किंवा तक्रार आली तर त्याचा निपटारा करण्याची जबाबदारी अक्षय रावत यांची, हरप्रितसिंघ मेजर हे हिशोब बघत होते आणि मी रणदिपसिंघ सरदार सर्व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणे, पैसे वाटप करणे आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तर फरार राहुन अटपुर्व जामीन होईपर्यंत प्रतिष्ठाणापासून दुर राहाणे. प्रविण पोकर्णा कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तर वकीलांकडून जामीन करुन घेत होता. अशा प्रकारे फायनान्सचा धंदा जोरात सुरू झाला.
सन 2017 मध्ये माझ्याविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पहिल्या गुन्ह्यानंतर तक्रारी वाढल्या. तरीपण माझे भागिदार त्या तक्रारींचा निपटारा करत होते. कृष्णूर येथे प्रविण पोकर्णा आणि अक्षय रावत यांचाही व्यवसाय होता. तेथे कार्यवाही झाली तेंव्हा हे दोघेपण बरेच दिवस गायब राहिले. पण कांही दिवसांनंतर पुन्हा बाजारात आले. घडलेल्या सर्व प्रकारामुळे मी घाबरुन गेला आणि कुटूंबियांच्या सांगण्यानुसार भागिदारी व्यवसायऐवजी स्वतंत्र व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यानंतर प्रविण पोकर्णा आणि अक्षय रावत यांनी मला सांगितले की, कृष्णूरचे प्रकरण घडले तरी आमचे कांही, कोठेही नाव आले नाही. आम्हाला लहान माणुस समजू नकोस, आम्ही सर्व सांभाळून घेवू तरी सुध्दा मी त्यांच्यसोबत व्यवसाय करण्यास नकार दिला आणि हरप्रितसिंघ मेजर आणि सतपालसिंघ खालसा यांच्यसोबत व्यवसाय सुरूच ठेवला. पण पुढे मेजर आणि खालसा माझ्यासोबत काम करण्यास तयार नव्हते. म्हणून मी एकटा माझा व्यवसाय करू लागलो.
या पुढे हजुरी खालसा फायनान्सशी मिळते जुळते नाव वापरून खालसा फायनान्स नावाने प्रविण पोकर्णा, अक्षय रावत, हरप्रितसिंघ मेजर, सतपालसिंघ खालसा यांनी नवीन फायनान्स व्यवसाय सुरू केला. माझ्याकडील काम करण्याची पध्दत पाहुन त्यांना दुखत राहिले आणि माझ्याविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करायला लावला. एक नव्हे तर चार गुन्हे दाखल करायला लावले. माझ्या फायनान्समधील कर्मचारी फोडून आपल्याकडे घेतले. कशाही प्रकारे माझ्या सत्यानाश व्हावा यासाठी त्यांनी अटकोट प्रयत्न केले. खालसा फायनान्सविरुध्द सुध्दा एक गुन्हा दाखल झाला होता. त्यात या सर्वांनी मिळून तो प्रकार पडद्या मागेच संपवला. माझ्या विरुध्द कट रचण्याची त्यांची सवय गेली नाही आणि त्यांनी आपले खलबत सुरूच ठेवले.
29 मार्च रोजी नांदेडच्या गुरूद्वाऱ्यामध्ये होळी सणादरम्यान काढण्यात आलेल्या मिरवणूकीत हिंसाचार घडला. त्यात प्रविण ओमप्रकाश पोकर्णा यांनी पोलीसांशी संगणमत करून माझे नाव त्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या निवेदनात कोणता पोलीस जबाबदार आहे,हे लिहिलेले नाही. रणदिपसिंघ सरदार आपल्या निवेदनात लिहितात मी या वर्षीच नव्हे तर कधीच होळीच्या मिरवणूकीत गेलो नाही. मी पोलीस आणि न्यायालय यांच्या उंबरठ्यावर चकरा मारत राहाव्यात असे हे षडयंत्र आहे. माझ्या या जुन्या चार भागिदारांबाबत सुध्दा प्रशासनाने सखोल चौकशी करावी. माझ्या संदर्भाने सुध्दा खोटे नाव गोवण्याचा प्रयत्न याही बाबीची चौकशी करून मला न्याय द्यावा असा टाहो रणदिपसिंघ सरदार यांनी आपल्या निवेदनात फोडला आहे.
