नांदेड(प्रतिनिधी)-गुप्त धन काढण्याचा प्रयत्न वाका ता.लोहा येथे झाला. हा प्रकार आज पहाटे 3 वाजता उजेड पडण्याच्या अगोदर घडला. उस्माननगर पोलीसांनी त्यापैकी दोघांना सायंकाळी 5 वाजता अटक केली आहे. इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती उस्माननगरचे पोलीस निरिक्षक दिरप्पा भुसनुर यांनी दिली आहे.
आज 12 जून रोजी पहाट होण्या अगोदरच्या अंधारात 3 वाजता गुप्त धन काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती उस्माननगर पोलीसांना मिळाली. वाका येथील योगेश हंबर्डे यांच्या शेतात हा प्रयत्न सुरू होतो. त्या ठिकाणी शिवानंद उर्फ गजानन कोमटवार रा.रावेर ता.नायगाव, तिरुपती नरवाडे आणि शंकर राठोड दोघे कृष्णूर तांडा, धर्मा जाधव आणि वैशाली गायकवाड दोघे रा.पुर्णा आणि त्यांच्यासोबत इतर ती जण वाका शिवारात जादुटोणा करून लिंबू, हळद, कुंकू, नारळ, स्वत: जवळ बाळगून गुप्त धन्य काढण्याची तयारी करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उस्माननगर पोलीसांनी तेथे जावून शिवानंद कोमटवार आणि तिरुपती नरवाडे या दोघांना ताब्यात घेतले. इतर सहा जणांचा अद्याप सुुगावा पोलीसांना लागला नाही.
उस्माननगर पोलीसांनी महाराष्ट्र नर बळी आणि अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 च्या कलम 3आणि अनुसूची 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शिवानंद कोमटवार आणि तिरुपती नरवाडे यांना दि.12 जूनच्या सायंकाळी 5 वाजता अटक करण्यात आली आहे. पोलीस निरिक्षक दिरप्पा भुसनुर यांनी सांगितले की, इतर सहा जणांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक थोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथके जादुटोणा करणाऱ्या इतरांचा शोध घेत आहेत.