नांदेड(प्रतिनिधी)-28 एप्रिल 2021 रोजी सामाजिक कार्यकर्ते शिवदास ढवळे यांनी आत्मदहन केल्याप्रकरणी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी मुंबईच्या आझाद मैदानावर 17 जून 2021 पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे अशी माहिती नांदेड जिल्हा स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिनभाई मांजरमकर यंानी प्रसिध्दपत्रकात दिली आहे.
दि.28 एप्रिल रोजी वन परिक्षेत्र नांदेड येथील भ्रष्टाचार आणि 4 हरिण व 10 मोरांची हत्या प्रकरणी शिवदास ढवळे यांनी आत्मदहन केले होते. पण या प्रकरणातील मुख्य आरोपी सहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रय शामराव पवार व इतर अधिकारी श्रीधर कवळे, सी.जी.पोतुलवार, बंडगर, ए.बी.रासने, चांद्रवाड, एम.एम.पवार आणि केंद्रे यांच्याविरुध्द कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शिवदास ढवळे यांच्या मृत्यूस ही सर्व मंडळी जबाबदार असून भारतीय दंड संहितेच्या कलम 306 आणि ऍट्रासिटी कायदानुसार यांच्यावर कार्यवाही व्हावी असे निवेदन 10 जून रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले आहे. मागणी मान्य झाली नाही तर 17 जून 2021 पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
