नांदेड

मध्यवर्ती बसस्थानकात क्युआरटी पथकाने एका अतिरेक्याला घातले कंठस्नान आणि एकाला पकडले ;ही होती रंगीत तालीम

नांदेड(प्रतिनिधी)- शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकावर अतिरेक्यांनी हल्ला करून प्रवाशांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळताच नांदेडच्या जलद प्रतिसाद पथकाने (क्युआरटी)ने एका अतिरेक्याला कंठस्नान घालून एकाला जिवंत पकडल्याची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) झाली.
नांदेड जिल्हा जलद प्रतिसाद पथकाला दुपारी 3 वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की, नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकावर काही अतिरेक्यांनी दहशतवादी हल्ला करून काही प्रवासी नागरिकांना ओलीस ठेवले आहे. जलद प्रतिसाद पथकाचे 23 जवान काही क्षणातच तेथे धावले. बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा बसस्थानक गाठले. बसस्थानकावर दोन अतिरेकी काही प्रवाशांना ओलीस ठेऊन दिसले. जलद प्रतिसाद पथकाने पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, गृह पोलीस उपअधीक्षक विकास तोटावार यांच्या मार्गदर्शनात त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करत एका अतिरेक्याला कंठस्नान घातले आणि एका अतिरेक्याला जिवंत पकडले. यामुळे ओलीस असलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका झाली. या पथकात राखीव पोलीस निरीक्षक शहादेव पोकळे, सहायक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे, राखीव पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाटील तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलीस निरीक्षक गुट्टे आणि त्यांचे अनेक अंमलदार सोबत बॉम्ब शोधणारा श्वान सहभागी झाले होते.
मॉक ड्रिल झाल्यानंतर पोलिसांनी जमलेल्या नागरिकांना जमावाला समजुन सांगितले की, असे घडले तर आम्ही काय कार्यवाही करतो आणि अशावेळी जनतेकडून काय अपेक्षा आहे. काही नागरिकांनी प्रतिक्रिया दिली की, सुरूवातीला आम्हाला सुद्धा काही तरी विपरीत घडल्याचा भास झाला, पण पोलीस पथकाने अत्यंत विद्युत वेगात कार्यवाही करून झालेली घटना ही मॉक ड्रिल (रंगीत तालीम) असल्याचे समजून सांगितल्याने आमचा जीव भांड्यात पडला.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *