नांदेड (प्रतिनिधी)-बजाज फायनान्स कंपनीचे कर्ज देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाली. इतवारा पोलीसांनी त्यातील दोघांना कल्याण येथे छापा टाकून पकडून आणले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या दोघांना चार दिवस, 14 जून 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड येथे अब्दुल मोबीन अब्दुल माजीद बागवान यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्यांना बजाज फायनान्सच्या नावाने वेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आले आणि 25 लाखांचे कर्ज मंजुर झाले आहे. हे कर्ज मिळविण्यासाठी तुम्हाला 50 हजार रुपये विमा रक्कम भरावी लागेल असे सांगून त्यांच्याकडून 50 हजार रुपये एका खात्यात भरून घेतले. पण त्यांचे कर्ज मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. इतवारा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 80/2021 दाखल केला. या प्रकरणाचा शोध लावतांना तांत्रिक मदतीने हे कॉल सेंटर कल्याण, ठाणे येथे असल्याचे समजले. तेंव्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळै यांची कायदेशीर परवानगी घेवून इतवाराचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक कृष्णा काळे, पोलीस अंमलदार वाडीयार आणि ज्ञानेश्र्वर कलंदर कल्याण येथे गेले. तेथून त्यांनी ठाणे पोलीसांच्या मदतीने बजाज फायनान्स नावाने सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून दिनेश चिंचलकर, (25) आणि रमेश शेरकर (27) यांना पकडले. त्या कॉल सेंटरमधील 27 वेगवेगळे मोबाईल एक लॅपटॉप संगणक आणि अनेक कागदपत्र जप्त केली. या जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 1 लाख 10 हजार 500 रुपये आहे. पकडलेल्या दोन्ही आरोपींना नांदेडला आणल्यानंतर कायदेशीर मदतीने या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम या कलमांची वाढ झाली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे, त्यांचे सहाय्यक पोलीस अंमलदार गंगाराव जाधव आणि तिरुपती तेलंग हे करीत आहेत.
आज दिनेश चिंचलकर आणि रमेश शेरकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या दोघांना चार दिवस पोलीस कोडीत पाठवले आहे. बनावट कर्ज प्रकरणाचा फरदा फाश करणाऱ्या इतवारा पोलीसांचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.
