3 लाख 27 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे एक दुकान आणि एक बिअर बार फोडून चोरी झाली आहे. शिवाजीनगर, विमानतळ आणि नांदेड ग्रामीण येथे प्रत्येकी एक-एक दुचाकी चोरीला गेली आहे. शिवाजीनगर भागातून एक ऍटो चोरी झाला आहे. वजिराबाद भागातून एक मोबाईल चोरी झाला आहे. मौजे गुटूर ता.कंधार येथून दोन म्हैशी व दोन बैल चोरीला गेल्या आहेत.
अतुल जनार्धन जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 जूनच्या रात्री 8.30 ते 9 जूनच्या पहाटे 8.15 दरम्यान शिवाजी चौक लोहा येथील जाधव कृषी सेवा केंद्र आणि सौरभ बार चोरट्यांनी फोडले. कृषी सेवा केंद्रातून 28 हजार रुपये रोख रक्कम चोरली आणि सौरभ बारमधील काचाफोडून 62 हजार रुपये चोरले. या दोन्ही ठिकाणी मिळून 62 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मारोती सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.
मारोती मोतीराम यन्नावार यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 यु.2265 ही गाडी 8 जून रोजी रात्री 10 ते 9 जूनच्या सकाळी 6 वाजेदरम्यान त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी लंपास केली आहे.या गाडीची किंमत 20 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार घुगे अधिक तपास करीत आहेत.
प्रल्हाद दिगंबर सूर्यवंशी यांीन आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.डब्ल्यू.2474 ही 2 जून रोजी रात्री 8 ते 3 जून रोजी सकाळी 7 वाजेदरम्यान गोकुळनगर सांगवी नांदेड येथून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 50 हजार रुपये आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पावडे अधिक तपास करीत आहेत.
विशाल नागोबा गडंबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 मे च्या रात्री 9.30 ते 10 वाजेदरम्यान त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.क्यु.7891 ही 10 हजार रुपये किंमतीची गाडी रुबी मंगल कार्यालयाच्या गेटसमोरून चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.
माधव पांडूरंग वसुरे यांनी आपला ऍटो क्रमांक एम.एच.26 बी.डी.4599 हा 7 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता रुपा गेस्ट हाऊस वसंतनगर येथे उभा केला होता तो चोरीला गेला. ऍटो उभा करून माधव वसुरे हे भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. या ऍटोची किंमत 70 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.
गौरव रामकिशन कोटगिरे, यांचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल 9 जून रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास संतकृपा मार्केटमध्ये बॅटरी खरेदी करतांना चोरीला गेला आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार सय्यद हे करीत आहेत.
नरसींग संग्राम आगलावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे गुटूर येथील त्यांच्या शेतात 6 जून रोजी रात्री 10.30 वाजता त्यांनी दोन बैल आणि दोन म्हैशी अशी 1 लाख रुपये किंमतीची जनावरे बांधली होती. 8 जूनला सकाळी 8 वाजता ते शेतात आले तेंव्हा चारही जनावरे चोरीला गेली होती. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक झुंजारे अधिक तपास करीत आहेत.
