

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव -जुन महिना सुरु झाला की शैक्षणिक सत्र सुरु होते. त्यामुळे पालक व विद्यार्थी शैक्षणिक साहित्य खरेदीच्या हालचाली सुरु करतात. मात्र सलग दुसऱ्या वर्षी शाळा महाविद्यालये सुरु होण्याबाबत प्रश्नचिन्ह असल्याने. पुर्व प्राथमिक ते पदवीधर शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी घरातच बसूनच आँनलाईन शिक्षण घेत आहेत. परिणामी शैक्षणिक साहीत्याची उलाढाल ठप्प झाली असून शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्यांचे अर्थिक गणित कोलमडले आहे. तर दुसरीकडे मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
नायगाव तालुक्यात पुर्व प्राथमिक पासून ते दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थ, डिएड, बि एड, फार्मसी, पँरामेडीकल यासह इतर छोट्या मोठ्या कोर्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २० हजाराच्या वर आहे. त्यामुळे दरवर्षी जुन महीना सुरु झाला की शालेय साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकात हालचाली सुरु होतात. गणवेशापासून ते वह्या, पुस्तके, कंपास, पेन,गाईडस् या शैक्षणिक साहित्यासह छत्र्या, बुट , रेणकोट, दप्तर, बँगा अदि साहित्य खरेदीच्या माध्यमातून लाखो रुपयाची उलाढाल होते.
गेले वर्षभर विद्यार्थी घरातच आहेत आणि यंदा ही शाळा महाविद्यालये सुरु करण्याबाबत शासनाचे धोरण ठरले नाही. त्यातच बंद चालूचा खेळ चालूच आहे त्यामुळे शैक्षणिक साहित्य विक्रीची बाजारपेठ ठप्प आहे. सध्या जे काही कोर्सेस व शाळा महाविद्यालयाचे अध्यापन चालू आहे ते आँनलाईन सुरु आहे सर्व विद्यार्थी घरातच बसून आहेत. त्यामुळे तर्तास शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परिणामी शालेय साहित्य विक्री करणाऱ्यांची दुकाने बंदच आहेत.
दुसऱ्या वर्षीही शाळा सुरु होण्याबाबत असलेली संभ्रमावस्था आणि अभ्यासक्रम बदलाचे मिळत असलेले संकेत पाहता सध्या ज्या दुकानात पुस्तके आणि गाईड आहेत ते कालबाह्य ठरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. याचा अर्थिक फटका दुकानदारा़नाच बसणार आहे. अद्याप कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आलेली नसताना वैद्यकीय तज्ञाकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता मावळली असल्याने शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याकडे पालक व विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहू याचा परिणाम शैक्षणिक साहित्य खरेदी विक्रीवर निश्चितच होणार आहे.
मोबाईलचा अतिवापर वाढला…….
लाँकडाऊनचा काळात आँनलाईन शिक्षण प्रणाली उपयुक्त ठरत असली तरी मोबाईलचा अतिवापर हा मुलांच्या अंगलट येत आहे. दिवसभर मुलांच्या हातात मोबाईल आहे. अतिवापरामुळे मोबाईलची सवय होत असून मोबाईल थोड्या वेळासाठी विद्यार्थी दुर ठेवण्यास तयार नाहीत. त्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डोळे लाल होणे, उन्हाकडे पाहू न शकणे, चश्मा लागणे व चश्मा असलेल्यांचा नंबर वाढत आहे. त्याचबरोबर अंधारी येणे अशा प्रकारचे त्रास वाढले आहेत. आँनलाईन शिक्षणाबरोबरच सोशल मिडीयाचाही वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही बिघडत चालले आहे.