नांदेड

नांदेडच्या होलाणी वाहतूक कंत्राटदार यांच्या घराची सीबीआयने घेतली झडती

अमरिकसिंघ बल यांची चौकशीची मागणी
नांदेड(प्रतिनिधी)-भोपाळ (मध्यप्रदेश) मध्ये भारतीय खाद्यनिगम (एफसीआय)च्या एका लिपीकाकडे एक कोटी रोख रक्कम सापडल्यानंतर त्याला सीबीआयने अटक केली. त्यानंतर आणखी चार जणांना अटक झाली. या सर्वांच्या तपासणीमध्ये सीबीआयला प्राप्त झालेल्या माहितीनुसार दि.8 जून रोजी सीबीआयचे पथक नांदेड येथील होलाणी यांच्या घरी आले होते. त्यांचे घर आनंदनगर येथे आहे. होलाणीने त्या भोपाळ येथील लिपीकाला नांदेडमध्ये भरपूर संपत्ती खरेदी करून दिली आहे अशी माहिती सीबीआयला मिळाली म्हणून ते येथे आले होते. होलाणीच्या एवढ्याच तपासणीत काही होणार नाही सीडब्ल्युसीचे नांदेड येथील 30 हजार टन धान्य साठवणूकीचे गोडाऊन बंद करण्यामध्ये होणालीचा हात आहे. दरवर्षाला जवळपास एक कोटीची रुपयांची शासकीयलुट होलाणी करतो. हा प्रकार नांदेडमध्ये आहे. त्याचे असे कारभार विविध राज्यांमध्ये एकूण 20 ठिकाणी आहेत याची पण चौकशी व्हावी अशी मागणी नांदेड येथील अमरीकसिंघ बल यांनी केली आहे.
भोपाळ येथील एका छाप्यानंतर सीबीआयची टीम नांदेड येथील आनंदनगर भागात 8 जून 2021 रोजी आली होती. होलाणी यांच्या घरातून त्यांनी कांही कागदपत्र जप्त केल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. भोपाळमध्ये पकडलेल्या एफसीआयच्या लिपीकाला नांदेडमध्ये दोन नंबरच्या कमाईमधून संपत्ती खरेदी करून देण्यात होलाणीचा हात असल्याचे बल सांगत होते. भोपाळच्या कार्यवाहीनंतर जळगाव येथे सुध्दा एका घराची तपासणी सीबीआयने केलेली आहे.
होलाणीची एवढी तपासणी करून चालणार नाही तर त्याची माहिती सांगतांना अमरिकसिंघ बल म्हणाले नांदेडमध्ये येणाऱ्या शासकीय धान्याची गोडाऊनमध्ये वाहतूक करण्याची निविदा होलाणी यांच्याकडे आहे. सध्या ती एम.ओ.होलाणी नावाने चालते. नांदेडमध्ये शासकीय धान्य साठवण्यासाठी जवाहरनगर येथे सीडब्ल्यूसीचे गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमध्ये 30 हजार टन धान्य साठवता येते. तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (एम.एस.डब्ल्यू.सी) यांचे गोडाऊन सिडको येथील ढवळे कॉर्नर येथे आहे. या गोडाऊनमध्ये 10 हजार टन धान्य ठेवता येते. एप्रिल 2020 मध्ये 850 रुपये मेट्रीक टन दराने होलाणीला एमएसडब्ल्यूसीचे काम मिळाले होते आणि ऑक्टोबर 2020 मध्ये सीडब्ल्यूसीचे काम 400 रुपये प्रति मेट्रीक टन दराने मिळाले.
या पध्दतीत कमी अंतरासाठी 850 रुपये आणि जास्त अंतरासाठी 400 रुपये असा दर मिळाल्याने होलाणीने जवाहरनगर येथे सीडब्ल्यूसीच्या गोडाऊनमध्ये रस्ते अयोग्य आहेत याची तक्रार करून एक समिती बोलावली. त्या समितीकडून सीडब्ल्यूसीचे गोडाऊन वाहतूकीसाठी अयोग्य असल्याचे अहवाल लिहुन घेतले आणि सीडब्ल्यूसीच्या गोडाऊनमध्ये 30 हजार टन धान्य राखीव ठेवण्याची पध्दत बंद करायला लावली. त्यामुळे एमएसडब्ल्यूसीच्या गोडाऊनमध्ये तेच धान्य 850 रुपये दराने पोहचविण्याची संधी होलाणीला प्राप्त झाली. मागील महिन्यात 6.5 रॅक धान्य नांदेडला आले होते. एका रॅकमध्ये 4 हजार टन धान्य असते. सध्याच्या सुरू असलेल्या जून महिन्या आता पर्यंत दोन रॅक आले आहेत. या सर्वांचा गुणाकार आणि बेरीज करून अमरिकसिंघ बल म्हणाले दरवेळेस शासनाचे एक कोटी रुपये होलाणी अशा पध्दतीने जास्तीचे घेतो.
सीडब्ल्यूसीच्या गोडाऊनला भेट दिली तेंव्हा सध्याच्या परिस्थितीत सीडब्ल्यूसीच्या गोडाऊनमध्ये सिमेंट रस्ते तयार आहेत. त्या ठिकाणी काम करणारे जवळपास 200 मजुर आज भिकेला लागले आहेत. आपला 450 रुपयांचा फायदा व्हावा म्हणून होलाणीने केलेली ही खेळी यशस्वी झाली आणि कामगार भिकेला लागले आहेत. असेच कामकाज ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर येथे आहे. तसेच मध्यप्रदेशमध्ये सुध्दा असे 10 जागी होलाणीचे कामकाज आहे. याचा अर्थ दहा जागी दर वेळेस एक कोटी म्हणजे शासनाच्या पैसा खाण्याची ही पध्दत होलाणीनेच वाहतूक विभागात आणली असे अमरिकसिंघ बल सांगतात. हिंगोली येथील होलाणी सन 2000 मध्ये नांदेडला आले. त्या अगोदर ते खुराणा या वाहतुक व्यवसायीकाकडे मुनिम होते असे अमरिकसिंघ बल म्हणाले. 20 वर्षात होलाणीने जमवलेली संपत्ती याच्याशी मला कांही घेणे-देणे नाही पण शासनाचे पैसे चुकीच्या पध्दतीने खावून गडगंज संपत्ती कमावण्याला माझा विरोध असल्याचे अमरिकसिंघ यांचे म्हणणे आहे.
सीबीआयने फक्त भोपाळ येथील चौकशी न करता होलाणीच्या ओएम होलाणी, दिनेश रोड लाईन्स आणि एमओ होलाणी या तीन वाहतूक कंपन्यांची सखोल चौकशी करावी.सीडब्ल्यूसीच्या गोडाऊनमध्ये 30 हजार टन धान्य आरक्षण रद्द करण्यामध्ये होलाणी आणि एफसीआयच्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हात असल्याचे बल सांगतात. तेंव्हा शासनाचा निधी जो भारताच्या सर्वसामान्य माणसाचा निधी मानला जातो तो होलाणीने कशा पध्दतीने आपल्या घशात घातला हे आपोआप सिध्द होईल आणि शासनाच्या निधीचा अशा पध्दतीने अपहार करणाऱ्याला कायद्याच्या दृष्टीकोणातून योग्य दिशा मिळेल अशी अपेक्षा अमरिकसिंघ बल यांनी व्यक्त केली.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *