नांदेड (प्रतिनिधी) – कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची चर्चा गाजत असली तरी लोकांनी स्वत: जबाबदारी घेतली तर आपण तिसऱ्या लाटेला येण्यापासून वाचवू शकतो, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेत डॉ. विपीन यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निळकंठ भोसीकर आणि आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लॉकडाऊन उघडल्याच्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी व इतर अधिकारी पत्रकारांशी संवाद साधत होते. नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या कोरोना लाटेच्या वेळेत नांदेड जिल्ह्याचा कोरोनाबाधित रूग्णांचा दर 26.9 टक्क्यांपर्यंत पोहचला होता. पण जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आणि नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांचा दर 1.7 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात यश आले आहे. यापुढे रूग्णसंख्येत वाढ झाली तर पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वसामान्य जनतेने यापुढेही स्वत:ची दक्षता स्वत: घेणे आवश्यक आहे, तरच आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचू शकतो. या संदर्भाने विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यावर संशोधन सुरू आहे, त्यामुळे आजच काही नक्की निर्णय सांगता येणार नाही, अशी उत्तरे देण्यात आली. लसीकरण आणि त्याचा वेग यातील तुलना सांगताना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले. नांदेड जिल्ह्यासाठी उपलब्ध होणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागात नियोजन पद्धतीने लसींचा पुरवठा केला जात असून लसीकरण घेण्यासाठी जनतेला अर्थात एक-दुसऱ्याने एक-दुसऱ्याला प्रवृत्त करणे आवश्यक असल्याचे सांगितले. 21 जूननंतर मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होतील. नांदेड जिल्ह्यात 25 लक्ष लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पुर्ण करायचे आहे. आजपर्यंत जवळपास 5 लाख लसीकरण झाले आहेत. शेळगाव गौरी या गावाने शंभर टक्के लसीकरण करून घेतल्याची माहिती सांगण्यात आली.
म्युकर मायकोसिक या रोगाचे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 201 रूग्ण सापडले आहेत. रूग्णांनी उशीरा दवाखाना गाठल्याने त्यापैंकी 35 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रूग्णांच्या सुधारण्यात अत्यंत गतीमान वाढ झाली असून तो दर 96 टक्क्यांच्यावर पोहचला आहे. लॉकडाऊनच्या प्रभावी निर्बंधामुळे आपण रूग्णसंख्या कमी करू शकलो असे अधिकारी म्हणाले. यापुढेही जनतेतील प्रत्येक व्यक्तीने आपली काळजी आपणच घेण्याची गरज असल्याचे सांगत कोरोनाचा धोका अद्याप संपला नाही, हे स्पष्ट करताना डॉ. विपीन म्हणाले, कोरोना विषाणूमध्ये सुद्धा आपोआप बदल होत असून तो स्वत:ला त्रास देण्यालायक बनवतो, असे सांगितले.
