

सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांवर लाचेची कार्यवाही
नांदेड,(प्रतिनिधी)- कंधार पोलीस ठाण्यातील एका सहायक पोलीस उप निरीक्षकाला खाजगी माणसाच्या मदतीने ५ हजारांची लाच स्वीकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
एक तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३ जून रोजी तक्रार दिली की, कंधार येथे कार्यरत सहायक पोलीस उप निरीक्षक सुभाष चोपडे आणि खाजगी माणूस शेख फारुख त्यांच्या कडे १० हजार रुपये लाचेची मागणी करीत आहेत. कारण त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे कंधार येथे आलेल्या अर्जानुसार त्यांच्यावर काही कार्यवाही न करण्यासाठी १० हजारांची लाच मागणी होती.ही सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अरविंद इंगोले, पोलीस अंमलदार किशन चिंतोरे,एकनाथ गंगातीर्थ,जगन्नाथ अनंतवार,ईश्वर जाधव,नरेंद्र बोडके यांनी पार पाडली.
हि सापळा कार्यवाही प्रसार माध्यमांना देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ९ जून रोजी लाच मागणीची पडताळणी केली.तेव्हा तडजोडीनंतर लाचेची मागणी ५ हजार झाली.आज पूजा हॉटेल कुरूळा येथे सापळा रचण्यात आला आणि त्या सापळ्यात सुभाष म्हैसाजी चोपडे (५६) यांच्या सांगण्यावरून खाजगी माणूस शेख फारुख शेख युसूफ (४०) यांनी ५ हजारांची लाच स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना जेरबंद केले.कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही केली आहे. कालच इस्लापूर येथील पोलीस अंमलदार रामेश्वर आलेवाड हे १२ हजारांची लाचेची रक्कम घेऊन पळून गेल्याचा प्रकार इस्लापूर पोलीस ठाण्यात घडला आहे.
यांच्या लाच सापळ्याची माहिती देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असतील तसेच त्याच्या लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवकांचे एस.एम.एस., व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असल्यास आणि माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधून माहिती द्यावी तसेच टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02462253212 आणि पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांचा मोबाईल क्रमांक 8975769918 यावर सुध्दा भ्रष्टाचाराची माहिती देता येईल. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा जनतेला भ्रष्टाचाराची माहिती देता येईल.