नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घर फोडून चोरट्यांनी 43 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगल सांगवी येथील एका सेवानिवृत्त पोलीसाचे घरफोडून चोरट्यांनी 88 हजार 400 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. मुदखेड, हिमायतनगर आणि नांदेड शहरातील माळटेकडी भागातून 3 दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या पाच चोरी प्रकारामध्ये एकुण 2 लाख 96 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरट्यांच्या घशात गेला आहे.
अत्यंत कर्तव्यशिल काम करणाऱ्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांच्या हद्दीत पाण्याच्या टाकीजवळ सिडको येथे राहणारे शरद उध्दवराव डहाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जूनच्या दुपारी 4 ते 6 जुन सायंकाळी 5 वाजेदरम्यान त्यांच्या घरात कोणी नसतांना चोरट्यांनी त्यांचे घर फोडून कपाटाचे लॉकर तोडले आणि त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे तसेच टी.व्ही. असा 43 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक गव्हाणकर अधिक तपास करीत आहेत.
मंगल सांगवी येथे राहणारे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक केशव दत्तराम ऊपवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जून ते 7 जूनच्या पहाटे 7 वाजेदरम्यान त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाज्याचा कडीकोंडा तोडून कोणी तरी चोरटे आत आले आणि त्यांनी एका लोखंडी पेटीतील 30 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे मिळून 88 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक श्रीमंगले अधिक तपास करीत आहेत.
सय्यद मोईज सय्यद मोईन यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 डी.पी.3777 ही 80 हजार रुपये किंमतीची गाडी 4 जूनच्या रात्री 10 ते 5 जूनच्या पहाटे 6 वाजेदरम्यान सुभाषगंज मुदखेड येथून त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली आहे. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मुंडे अधिक तपास करीत आहेत.
नितीन गणेश राठोड यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.पी.2244 ही 7 जूनच्या मध्यरात्री 2 वाजता गणेशमंदिर हिमायतनगरजवळ असलेल्या त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली आहे. ह्या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार लक्षटवार अधिक तपास करीत आहेत.
सुनिलसिंह प्रतापसिंह ठाकूर यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.व्ही.9407 ही 60 हजार रुपये किंमतीची गाडी 7 जूनच्या मध्यरात्रीनंतर 3 वाजता माळटेकडी येथील त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार लोखंडे हे करीत आहेत.