क्राईम

लाचेचे 12 हजार घेवून ईस्लापूरच्या पोलीस अंमलदाराने ठोकली धुम

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे ईस्लापूर येथे 12 हजार रुपयांची लाच स्विकारून एक पोलीस अंमलदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा सुगावा लागताच लाच घेवून पळून गेला आहे.
ईस्लापूर भागातील एका 48 वर्षीय व्यक्तीला बिअर बारची परवानगी हवी होती. त्यासाठी त्याने केलेल्या अर्जाची तपासणी करण्यासाठी ती संचिका ईस्लापूर पोलीस ठाण्यात आली होती. याबाबत सकारात्मक अहवाल देण्यासाठी पोलीस अंमलदार रामेश्र्वर आनंदराव आलेवाड (34) पोलीस नाईक बकल नंबर 2043 याने 12 हजार रुपयांची लाच मागितली अशी तक्रार त्या बार परवानगी मागणाऱ्याने 30 मे 2021 रोजी नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. लाच मागणीची पडताळणी पंचासमक्ष 1 जून 2021 रोजी झाली. त्यानुसार आज दि.8 जून रोजी लाच स्विकारण्याचा दिवस ठरला. त्यानुसार लाच देणारा व्यक्ती आणि सरकारी पंच तेथे पोहचले. रामेश्र्वर आलेवाडने पंचासमक्ष लाचेचा स्विकार केला. त्यानंतर त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा असल्याचा वास आला. तेंव्हा रामेश्र्वर आलेवाड लाचेची 12 हजार रुपये रक्कम घेवून पळून गेला आहे. त्यानुसार ईस्लापूर पोलीस ठाण्यात रामेश्र्वर आलेवाड विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक राहुल पखाले, पोलीस अंमलदार बालाजी तेलंगे, गणेश केतकर, सचिन गायकवाड, गणेश तालकोकुलवार, शेख मजीब यांनी पार पाडली.
रामेश्र्वर आलेवाड यांच्या लाच सापळ्याची माहिती देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असतील तसेच त्याच्या लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवकांचे एस.एम.एस., व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असल्यास आणि माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधून माहिती द्यावी तसेच टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02462253212 आणि पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांचा मोबाईल क्रमांक 8975769918 यावर सुध्दा भ्रष्टाचाराची माहिती देता येईल. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा जनतेला भ्रष्टाचाराची माहिती देता येईल.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *