ताज्या बातम्या

पोलीस अधिकाऱ्यांच्या हेव्या दाव्याने चांगल्या अधिकाऱ्यांवर ग्रहण?

पालकमंत्र्यांनी अतिजलद दखल घेण्याची गरज
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाचा कारभार चालविण्यासाठी नांदेड जिल्ह्यात पोलीस उपमहानिरिक्षक यांचे कार्यालय आहे. एक पोलीस अधिक्षक, दोन अपर पोलीस अधिक्षक यांच्यासह अनेक पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरिक्षक असा एक उतरंडीची प्रक्रिया कार्यान्वीत आहे. पण दुर्देवाने सध्या जिल्ह्यात असलेल्या कांही अधिकाऱ्यांमुळे या जिल्ह्यात पोलीस दलातील प्रक्रिया परफ्केट चालत नाहीत. यासाठी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या घटनाक्रमाकडे अत्यंत बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. कारण प्रश्न सर्वसामान्य माणसाचा आहे. ज्या माणसाला भारतीय संविधानाने लोकशाहीतला सर्वात प्रमुख घटक असे संबोधीत केले आहे. सध्या जून महिना सुरू आहे. पालकमंत्र्यांनी हा महिना संपेपर्यंत त्यांच्या जिल्ह्यासाठी चुकीचे ठरणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांना शोधून कांही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलात चार जिल्ह्यांचा कारभार सांभाळणारे पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड शहरात वास्तव्यास आहेत. नांदेड जिल्ह्याचा कारभार चालविण्यासाठी त्यांच्याकडे एक पोलीस अधिक्षक, दोन अपर पोलीस अधिक्षक अनेक पोलीस उपअधिक्षक आणि अनेक पोलीस निरिक्षक कार्यरत आहेत. माणसांनी स्वप्ने पाहावीत असे म्हटले जाते. स्वत:चा प्रकाश स्वत: उज्वल करा असे तथागत गौतम बुध्दांचे मार्गदर्शन आहे. स्वयंप्रकाशीत होवून तो प्रकाश समाजाच्या उपयोगाला पडावा यासाठी सतत कार्यान्वीत राहण्याचा संदेश तथागतांनी दिलेला आहे. पण दुर्देवाने स्वयं प्रकाशीत होण्याऐवजी दुसऱ्यांच्या प्रकाशाला गृहण लावून काळोख निर्माण करण्याची एक चुकीची पध्दत तयार झाली आहे आणि ही चुकीची पध्दत वापरतांना पोलीस दलातील अधिकाऱ्यांना आपल्याकडे असलेल्या अधिकारांचा दुरपयोग करता येतो. आणि त्या दुरपयोगाच्या माध्यमातून एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला जेरीला आणण्याचा प्रयत्न सुरू असतो. अशी पध्दत सुरू असेल तर त्यावर वरिष्ठ अधिकारी, पालकमंत्री यांचे लक्ष आवश्यक आहे. कारण कांही ना कांही कारणांनी पोलीसांच्या नियुक्त्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप असतोच आणि त्याला नाकारण्याची ताकत कोणातच नाही. व्यासपीठावर, परिपत्रकांमध्ये तसा उल्लेख केला जातो हे सत्य असले तरी त्या सत्यामागील ध चा मा करण्याची पध्दत पेशवाईनंतर आज सुध्दा सुरू आहे. ध या अक्षराला म करणे अत्यंत अवघड आहे. पण ध चा मा झालेलाच आहे आणि एक उत्कृष्ट राजा त्याचा बळी ठरलेला आहे. त्यामुळे एक चांगले राज्य त्या काळी संपुष्टात आले होते.
स्वराज्याची उभारणी करतांना त्या राज्यात सुर्याजी पिसाळ होतच ना पण त्या सुर्याजी पिसाळांना आपली त्यांना आपली जागा आपोआप दिसली कारण त्यांचे जे काम होते त्यामुळे त्यांना ती जागा पाहावीच लागली. आजही ईतिहासात त्याची नोंद आहे. त्यामुळे त्याला नाकारतापण येत नाही. असेच कांही सुर्याजी पिसाळ नांदेड जिल्हा पोलीस दलात नियुक्त झाले आहेत आणि त्यांची ही नियुक्ती नांदेड जिल्ह्यासाठी घातकच ठरणारी आहे. आपले राज्य योग्य मार्गावर चालवतांना छत्रपती शिवरायांनी घेतलेल्या निर्णयानुसार आजही त्याची गरज आहे. हे अनेकदा विद्वानांनी सांगितले आहे. अनेक घटनांमधून हा प्रकार स्पष्टपणे जाणवला आहे. तरीपण पोलीस दलातील सुर्याजी पिसाळांवर वचक आणण्यासाठी कोणीच समोर आलेला नाही. उलट या सुर्याजी पिसाळांना ज्या लोकांनी नांदेडला आणले त्यांना आता नक्कीच आपली चुक झाली असे वाटत असेल.
नांदेड जिल्ह्यात पोलीस दलात आलेले कांही अधिकारी व्याजाचा व्यवसायपण करतात अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्यावर हा प्रभाव आला असेल त्याला सुध्दा नांदेडची नियुक्ती कारणीभुत आहे असेच म्हणावे लागेल. कारण महाराष्ट्रातील इतर ठिकाणांपेक्षा नांदेड जिल्ह्यात व्याजाचा व्यवसाय करून अत्यंत कमी वेळेत गर्भ श्रीमंत झालेल्या लोकांची कमतरता नाही. त्यांच्यासोबत राहुन पोलीस दलाच्या कांही अधिकाऱ्यांवर याचा प्रभाव पडला असेल पण आपल्याच सहकारी अधिकाऱ्यांच्या चांगल्या प्रकाशावर ग्रहण लावण्यासाठी तयार करण्यात येणारे खलबत यशस्वी झाले तर पोलीस खाते करील ते होईल हे तेवढेच खरे आहे. पण हे खलबत यशस्वी झाले तर ज्याच्यावर खलबत आखले गेले तो अभिमन्यु निघाला तर मग काय होईल या प्रश्नाचे उत्तर खलबत रचणाऱ्यांनी शोधायची गरज आहे. चक्रव्युहामध्ये फसलेला अभिमन्यु मरण पावला होता. कारण त्याने आपल्या आईच्या उदरात असतांना चक्रव्युहामध्ये आत जाण्याची कला शिकली होती. पण बाहेर निघण्याची नाही आणि त्यामुळे त्याला मृत्यू आला होता. पण सध्याच्या परिस्थितीत खलबताच्या पेचात अडकलेले व्यक्ती अभिमन्यु नाहीत त्यांच्यावर खलबत यशस्वी होवू लागले तर त्या खलबताला उचलून समुद्रामध्ये टाकून देण्याची ताकत त्यांनी आपल्या पोलीस सेवेत कमावलेली आहे. तेंव्हा खलबत रचणाऱ्यांनी सुध्दा कोणाच्याही ताकतीला कमी आखण्याची गरज नाही. त्यापेक्षा पोलीस दलाच्या नियमावलीप्रमाणे, भारतीय फौजदारी प्रक्रिया संहितेने दिलेल्या अधिकारांप्रमाणे लोकशाहीतील व्यक्तींची सेवा करणे हाच उद्देश ठेवावा. जेणे करून कांही आडवे मार्ग त्यातून उद्‌भवणार नाहीत.
जिल्ह्याचा कारभार पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत असतो कांही बाबी पालकमंत्र्यांना कानाडोळा कराव्या लागतात. यात दुमत असू शकत नाही. पण जिल्ह्यातील प्रत्येक माणसाचा विश्र्वास हा पालकमंत्र्यावर असतो आणि तो विश्र्वास प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करते. या यंत्रणेत सर्वात महत्वपूर्ण घटक पोलीस विभाग आहे आणि या पोलीस विभागावर पालकमंत्र्यांचे बारकाईने लक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे यासाठीच हा शब्द प्रपंच !

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *