नांदेड(प्रतिनिधी)-मराठा ओबीसीकरण हा उद्देश घेवूनच मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समिती स्थापन केली असून याबद्दल मराठवाड्यातील युवकांचे पाठबळ मिळविण्यासाठी मी मराठवाडाभर दौरा करीत असल्याचे समितीचे मुख्य संयोजक प्रदीप सोळूंके यांनी सांगितले.
आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे मुख्य संयोजक प्रदीप सोळुंके, इंजि.शिवाजी नरवाडे, विठ्ठल पावडे, बाळासाहेब देसाई, प्रशांत कदम, अश्विनी भालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दि.1 जून रोजी मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रदीप सोळुंके म्हणाले.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठा या जातीचा समावेश ओबीसीमध्ये आहे. त्याची अनेक उदाहरणे सांगतांना प्रदीप सोळुंके यांनी स्पष्ट केले की, अभिलेखांचा प्रश्न येतो तेंव्हा मराठा जातीची गणणाच उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही अभिलेख कोठून देणार. महाराष्ट्रातील विदर्भात मराठ्यांना आरक्षण आहे, तेलंगणात, कर्नाटकात आहे. कमीत कमी या संदर्भांचा उल्लेख घेवून मराठा आरक्षणावर विचार करण्याची गरज त्यांनी सांगितली. आता शैक्षणिक प्रमाणपत्रांवर आईचे नाव येत आहे. ज्या ठिकाणी आई आरक्षीत प्रवर्गात आहे त्या आईच्या अभिलेखानुसार मुलांना आरक्षण देण्यात यावे. कारण मराठवाड्याची जातीनिहाय संख्या उपलब्ध नाही आणि त्यामुळे नवीन आयोगांच्या प्रमाणे मराठा जातीचे व्यक्ती पुढारलेले ठरतात. आणि आरक्षणापासून वंचित राहतात. कालेलकर आयोग, बापट आयोग यांनी मराठ्यांना ओबीसी ठरवले होते. पण प्रत्यक्षात आरक्षण मिळाले नाही. अशा परिस्थितीत मराठा समाजाच्या प्रश्नांविषयी जनजागृती करणे हा सर्वात मोठा उल्लेख असल्याचे सोळुंके म्हणाले. मराठा समाजाचा प्रश्न घेवून जो कोणी काम करत असेल त्या प्रत्येक व्यक्ती सोबत मी व माझी संघटना आहेच असे सांगितले. मराठ्यांना आरक्षण देतांना हैद्राबाद राज्यातील मराठा समाजासंदर्भातील कागदपत्रे शोधून त्याचा अभ्यास करण्यासाठी सत्य शोधन समिती स्थापन करावी आणि त्यानुसार मराठा आरक्षण ठरावे अशी सोळुंकेची अपेक्षा आहे.
मराठा आरक्षणासोबतच अण्णासाहेब आर्थिक महामंडळाच्यावतीने दिले जाणारे कर्ज 25 लाख रुपये करावे आणि ते बॅंकेमार्फत न देता थेट महामंडळाने द्यावे. सोबतच 25 टक्के भाग भांडवल मागीतले जाते. ते 5 टक्के करावे अशी त्यांना अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या मोठा प्रश्न असलेला पाण्याचा विषय हा ही प्रदीप सोळुंके यांनी मांडला त्यात धरणांमध्ये राखीव पाण्याच्या नावाखाली जो साठा रोखला जातो तो साठा पाऊस पडल्याबरोबर सोडून दिला जातो. खरे तर उन्हाळ्यात ते राखीव पाणी शेतकऱ्यांना द्यावे जेणे करून त्या पाण्याचा फायदा शेतीसाठी होईल. मराठा समाजाचे शैक्षणिक मागासले पण दुर करण्यासाठी एक आदर्श निवासी शाळा तयार व्हावी आणि त्यातून शिक्षणाचा पाया मजबुत व्हावा अशी अपेक्षा प्रदीप सोळुंके यांनी व्यक्त केली. शिवराज्याभिषेक दिन 6 जून ते 11 जून या दिवसांमध्ये मराठवाडा दौरा करून मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीची भुमिका मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे असे प्रदीप सोळुंके म्हणाले.
