सात चोऱ्यांमध्ये 2 लाख 15 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करतांना दरोडेखोरांनी एका सोनार व्यापाऱ्याला जबर मारहाण केली. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेळी जबरदस्तीने चोरून नेण्यात आली आहे. बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडून चोरट्यांनी 81 हजार रुपये चोरले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत, वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मोटारसायकलची चोरी झाली आहे, वजिराबादच्या हद्दीतून एक मोबाईल चोरीला गेला आहे. शिवाजीनगरच्या हद्दीत एक चोरी झाली आहे. एकूण 7 प्रकारच्या या घटनांमध्ये 2 लाख 15 हजारांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 35 हजारांचा ऐवज व्यापाऱ्याच्या हिंमतीमुळे वाचला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षकांच्या हद्दीत 6 जून रोजी घडलेल्या एका प्रकारात अंधार पडण्याअगोदर सायंकाळी 5.45 वाजेदरम्यान सतिश बालाजी डहाळे हे आपली वाजेगाव येथील ज्वेलर्स दुकान बंद करून परत सिडकोकडे आपल्या घरी जात असतांना दुध डेअरी ते ढवळे कॉर्नर रस्त्यावर मारोती मंदिरच्या जवळ तीन अनोळखी मुलांनी त्यांची मोटारसायकल अडवून त्यांना दोन्ही हातांवर, पोटावर तलावरीने मारून जखमी केले आणि त्यांची 35 हजार रुपये किंमतीचा ऐवज असलेली बॅग बळजबरी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. पण सतिश डहाळेने हिंम्मत दाखवत त्यांच्या केलेल्या विरोधात ते जखमी झाले पण आपली बॅग त्यांनी चोरट्यांच्या हाती लागू दिली नाही. नांदेड ग्रामणी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गणेश होळकर अधिक तपास करीत आहेेत.
बजरंगसिंह अर्जुनसिंह ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जूनच्या सायंकाळी 6.30 वाजता आरोपी तेजपालसिंघ उर्फ तेजा उर्फ बांगा कुलवंतसिंघ चाहेल रा.कौठा याने अर्जुनसिंहच्या शेळीला ऍटोमध्ये ठेवून घेवून जात असतांना त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेंव्हा तुझ्या डोक्यात गोळी मारून उडवून देईल अशी धमकी देवून ती 7 हजार रुपये किंमतीची शेळी चोरट्यांनी बळजबरीने नेली आहे. विमानतळ पोलीसांनी तानाजीनगरमध्ये घडलेला हा गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जाधव हे करीत आहेत.
लालू राजू आरसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार साठे चौक बिलोली येथील त्यांच्या घराला फोडून चोरट्यांनी सोन्याचे नेक्लेस, दोन मंगळसूत्र आणि रोख रक्कम 25 हजार असा एकूण 81 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना 6 जूनच्या मध्यरात्रीनंतर 2.30 वाजता घडली. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक सय्यद अधिक तपस करीत आहेत.
सुधाकर जळबा गायकवाड यांनी आंबेडकरवादी मिशन सिडको येथे 5 जून रोजी रात्री 11 वाजता आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एम.1281 उभी केली होती. 6 जूनच्या सकाळी 6 वाजेदरम्यान ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कौठेकर अधिक तपास करीत आहेत.
रेल्वे स्थानक नांदेडच्या गेटसमोर प्रदीप रामसेवक गौतम यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एच.9178 दि.5 जून 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता उभी केली होती.15 मिनिटात त्यांची 35 हजार रुपये किंमतीची गाडी चोरट्यांनी पळवली. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भिमराव भद्रे अधिक तपास करीत आहेत.
मुक्तेश्र्वर अशोक काटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जून रोजी सकाळी 4.30 ते 5.15 या वेळेदरम्यान त्यांच्या मुलाचा मोबाईल विठ्ठाई हॉस्पीटल नांदेड येथून चोरीला गेला आहे. या मोबाईलची किंमत 35 हजार रुपये आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार वाघमारे अधिक तपास करीत आहेत.
वैशाली विश्र्वनाथ पाईकराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जून रोजी मध्यरात्री 3 नंतर पहाटे 6 वाजेदरम्यान संजीवनी हॉस्पीटलमध्ये जनरल वॉर्डमध्ये त्यंाच्या बॅगमधील 15 हजार रुपयांचा मोबाईल आणि 2 हजार रुपये रोख रक्कम असा 17 हजारांचा ऐवज कोणी तरी चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पांचाळ हे अधिक तपास करीत आहेत.
