नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 1 जूनपासून नवीन आदेश काढण्यात आले. त्या अनुशंगाने बे्रक द चैन या शासनाच्या कार्यक्रमाअंतर्गत नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी काय सुरू राहिल आणि काय बंद राहिल या संदर्भाचा एक आदेश आज जारी केला आहे.
नांदेड जिल्ह्यात कोविड बाधीत होणाऱ्या रुग्णांचा दर 1.93 टक्के आहे. नांदेड जिल्ह्यात ऑक्सिजन बेडच्या आवश्यकतेची टक्केवारी 4.28 टक्के इतकी आहे. यामुळे नांदेड जिल्हा लॉकडाऊन उघडण्याच्या यादीतील पहिल्या स्तरामध्ये आहे. त्यात शासनाने केलेल्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 25 विविध कामकाजाबाबत ते नियमित सुरू राहिल असे सांगितले आहे.
नियमित सुरू राहणारे कामकाज पुढील प्रमाणे आहेत. अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना सुरू राहतील. त्यांच्यासाठी सुनिश्चित केलेली वेळ ही मागील आदेशाप्रमाणे असेल. आवश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना त्यांना दिलेल्या वेळाप्रमाणे सुरू राहतील. मॉल्स, सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रिन, नाट्यगृह नियमित सुरू राहतील. रेस्टॉरंट नियमित सुरू राहतील. लोकल ट्रेनबाबत नांदेडशी संबंध नाही. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलींग, खाजगी आस्थापना, खाजगी कार्यालय नियमित सुरू राहतील. कार्यालयातील उपस्थिती 100 टक्के राहिल. खेळ आणि क्रिडा प्रकार नियमित सुरू राहतील. चित्रीकरणाला नियमित परवानगी देण्यात आली आहे. धार्मिक, सामाजिक, राजकीय, संस्कृतीक करमणुकीचे कार्यक्रम, मेळावे नियमित घेता येतील.लग्न समारंभात 100 व्यक्तींना बोलावता येईल. अत्यंयात्रा आणि अंतिम विधी यासाठी 50 व्यक्तींची मर्यादा विहित करण्यात आली आहे. बैठका, निवडणुक, सर्वसाधारण सभा नियमित होतील. बांधकाम, कृषी व कृषी पुरक सेवा, ई कॉमर्स व वस्तु व सेवा नियमित सुरू राहतील. जमाव बंदी आणि संचार बंदी साथ रोग नियंत्रणाच्या मर्यादेत राहिल. व्यायाम शाळा, केस कर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर नियमितपणे सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एस.टी.बसेस नेहमीच प्रमाणे विना निर्बंध सुरु राहतील. माल वाहतूक करतांना त्या गाडीत तीन लोकांना जाण्याची परवानगी आहे. खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्याच्या रेल्वे, प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास नियमित सुरू राहिल परंतू शासनाच्या नियमामध्ये स्तर पाचमध्ये थांबा घेवून पुढे जाणाऱ्या प्रवाशांना ई पास आवश्यक असेल. उत्पादक घटक, निर्यात आदी व्यवसाय करणाऱ्या उद्योगांचे कामकाज नियमित सुरू राहिल. निर्माण क्षेत्रा नियमित सुरू राहिल. या आदेशात समाविष्ट नसलेले निर्माण क्षेत्र या पुढे नियमित सुरू राहतील.
या सर्व सुविधांसह कोरोना नियमावलीतील मास्क वापरणे, सॅनेटायझरचा वापर करणे, शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे. या सर्व कामांची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड, मनपा आयुक्त, सर्व नगर परिषदा, नगर पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर राहिल. या आदेशाची अंमलबजावणी करतांना सद्भावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरुध्द कार्यवाही केली जाणार नाही. नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधीतांची टक्केवारी आणि ऑक्सिजन बेडची गरज वाढली तर या आदेशात बदल करून नवीन आदेश निर्गमित होणार आहे.
शाळा, कॉलेज, धार्मिकस्थळे, शिकवणी क्लासेस याबद्दलचा उल्लेख आजच्या आदेशात नाही. पण आजच्या आदेशात मागील खंडीभर आदेशांचा संदर्भ जोडण्यात आला आहे म्हणजे शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, शिकवणी क्लासेस बंद राहतील हे निश्चितच आहे. त्यावर उगीचच व्हॉटसऍप संकेतस्थळावर चर्चा सुरू झाली आहे. पण मागील आदेशांचा संदर्भ वाचायचा असतो हे व्हॉटसऍपवर चर्चा करणाऱ्यांना कोण समजावून सांगेल.