कोणताही दबाव न बाळगता झाल्या नियुक्त्या
नांदेड(प्रतिनिधी)-मागील महिन्यात पोलीस महासंचालकांनी राज्यातील जवळपास 400 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती दिली होती. त्यानंतर नांदेड पोलीस परिक्षेत्रात 4 जिल्ह्याच्या 40 पदोन्नती प्राप्त पोलीस उपनिरिक्षकांना पाठविण्यात आले होते. त्या सर्वांना ज्या जिल्ह्यातून आले त्याच जिल्ह्यात परत पाठविण्याचे आदेश पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी जारी केले होते. नांदेडला आलेल्या 20 पोलीस उपनिरिक्षकांच्या नियुक्त्या आज पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केल्या. या नवीन नियुक्त्यांमध्ये कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रमोदकुमार शेवाळे यांनी ह्या नियुक्त्या केल्या आहेत. कांही पोलीस निरिक्षकांनी अमुक व्यक्ती परत मला मिळावा यासाठी पोलीस अधिक्षक कक्षाचे उंबरठे झिजवले होते. पण त्यांना यश आले नाही.
मागील महिन्यात पोलीस महासंचालक कार्यालयाने जवळपास 400 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती दिली होती. त्यातील 40 जणांची नियुक्ती नांदेड पोलीस परिक्षेत्रात केली होती. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे- 20, परभणी जिल्ह्याचे-10, लातूर जिल्ह्याचे- 7 आणि हिंगोली जिल्ह्याचे -3 असे एकूण 40 अधिकारी होते. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी या सर्व 40 जणांना ज्या-जिल्ह्यातून आले त्याच जिल्ह्यात पुन्हा नियुक्त केले.
नांदेडमध्ये आलेल्या 20 जणांची आज पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी नियुक्ती केली. त्यातील बहुतांश जणांना ज्या पोलीस ठाण्यात ते पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत होते. त्यांना तेथेच पाठविले आहे. कांही नामांकित पोलीस अंमलदार हे आता पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत. त्यांच्यावर जिल्ह्याचा कारभार सोपवत पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी त्यांना नांदेडच्या जिल्हा नियंत्रण कक्षात नियुक्त केले आहे. यामधील एका पोलीस अंमलदाराला पुन्हा आपल्याच पोलीस स्टेशनला द्यावे यासाठी त्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकाने पोलीस अधिक्षक कार्यालयाचे उंबरठे काल दि.4 जून आणि आज दि.5 जून रोजी झिजवले. पण त्याचा कांही एक उपयोग झाला नाही आणि त्या महान व्यक्तीची नियुक्ती सुध्दा नियंत्रण कक्षात झाली आहे.
आज नियुक्त करण्यात आलेले पदोन्नती प्राप्त पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत.नागोराव बालाजी कुंडगिर, उत्तम शंकरराव वरपडे,बाबू तुकाराम केंद्रे, रामदास संभाजी श्रीमंगले, महेश हणमंतराव कुलकर्णी, सुभाष दत्तरामजी धात्रक- नियंत्रण कक्ष नांदेड, सुधाकर सटवाजी मुसळे-आर्थिक गुन्हे शाखा, शेख अब्दुल लतिफ शेख अब्दुल रहिम-पोलीस ठाणे मुदखेड, माधव मसणाजी वाडेकर-पोलीस ठाणे बिलोली, संजय उत्तमराव अटकोरे- पोलीस ठाणे उमरी, अविनाश गोविंदराव राजपुत-जिल्हा विशेष शाखा, माणिक देवराव हंबर्डे- वाचक शाखा, मधुकर पंढरीनाथ जायभाये-पोलीस ठाणे मुखेड, दिपक रामचंद्र भोपळे-पोलीस ठाणे ईस्लापूर, अर्जुनसिंह गणेशसिंह ठाकूर-विमानतळ सुरक्षा, भारत पंडीतराव सावंत-पोलीस ठाणे हदगाव, विनायक नागोराव केंद्रे-पोलीस ठाणे लोहा, उत्तम दगडूजी बुक्तरे-पोलीस ठाणे मुदखेड, अरुण सुर्यकांत मुखेडकर- पोलीस ठाणे लोहा, हरजिंदरसिंघ बलवंतसिंघ चावला-दहशतवाद विरोधी कक्ष असे आहेत.
