नांदेड(प्रतिनिधी)-4 जून रोजी पिंपरी ता.कळमनुरी या गावाजवळ दगडावर चढून उभी राहिलेल्या एका बंद महागड्या चार चाकी गाडीत एक जळालेले प्रेत सापडले. हा व्यक्ती नांदेड जिल्ह्यातील कलदगाव ता.अर्धापूर येथील रहिवासी आहे. आखाडा बाळापूर पोलीस या बाबत घडलेल्या घटनेचा शोध घेत आहेत. पोलीसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेले आहे.
4 जून रोजी सकाळी पिंपरी शिवारात एक महागडी चार चाकी गाडी दगडावर अडकून उभी होती. ही कार सकाळपासून तेथेच बंद असल्याने लोकांनी दुर्लक्ष केले. सायंकाळी या कारमध्ये लोकांना मृतदेह दिसला आणि याची माहिती जनतेने आखाडा बाळापूर पोलीसांना दिली.
हिंगोलीचे पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, पोलीस उपअधिक्षक हाशमी, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय हे घटनास्थळी पोहचले.पोलीसांच्या लक्षात आलेल्या परिस्थितीनुसार मयत व्यक्ती हा माणिक राजेगोरे (48) रा.कलदगाव ता.अर्धापूर असा आहे. पोलीसांनी सांगितलेल्या माहितीनुसार अगोदर गळादाबून त्यांचा खून करण्यात आला आणि नंतर त्यांच्यावर पेट्रोल टाकून जाळून देण्यात आले आहे. पोलीसांनी ठसे तज्ञ आणि वैध वैज्ञानिक प्रयोग शाळेतील तंत्रज्ञाना बोलावून तपासणी केली आहे. मरण पावलेले माणिक राजेगोरे यांना राजकीय पार्श्र्वभूमीपण आहे.
