नांदेड

स्वस्त धान्य दुकानदार जमा करत असलेले 30लाख वाटप कोठे होणार ?

नांदेड(प्रतिनिधी)-स्वस्त धान्य दुकाने, दुकानदार, पुरवठा विभागातील व्यक्ती आणि महसुल विभागाचे प्रमुख हा सर्व विषय नेहमीच चर्चेत राहणारा मुद्दा आहे. अत्यंत खात्रीलायक माहितीनुसार जिल्हाभरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून 22 लाख रुपये जमा करण्याची एक प्रक्रिया सुरू आहे. त्याचे वाटप कसे होणार याची मात्र माहिती प्राप्त झाली नाही. ही मोठी रक्कम जमा करण्याची जबाबदारी एका स्वस्त धान्य दुकानदारावर आहे.
नांदेडच्या तहसील विभागातील स्वस्त धान्य पुरवठा विभाग आणि त्यातील व्यक्ती हा विषय बऱ्याच दिवसांपासून गाजत आहे. नांदेड तहसील कार्यालयाअंतर्गत 230 स्वस्त धान्य दुकाने आहेत. कांही दिवसांपुर्वीच 11 लाखांचा झालेला कमीशन वाटपातील घोळ मार्जिन या नावावर स्वस्त धान्य दुकानदारांना वितरीत करून तो घोळ मिटविण्याचा प्रयत्न झाला. पण तो घोळ झाला होता. 11 लाख रुपये एका बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या खात्यावर गेले कसे, पुन्हा परत शासकीय खात्यात आले कसे आणि मार्जिनच्या नावावर वितरीत कसे केले. याचा शोध कोणी घेईल का नाही माहित नाही. पण हा घोळ मात्र नक्कीच झाला आहे.
तसेच कांही स्वस्त धान्य दुकानदारांना 50 क्विंटल शासकीय धान्याचे पैसे भरून घेवून प्रत्यक्षात 44 क्विंटल धान्य दिले असा प्रकार सन 2020 च्या डिसेंबर आणि जानेवारी 2021 च्या महिन्यात झाला. त्यात असे कमी धान्य देवून 1200 क्विंटल तांदळाचा घोळ झालेला आहे. या घोळाचाही छडा कोणी लावेल की नाही हे माहित नाही.
अत्यंत खात्रीलायक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून प्रत्येकी 3 हजार रुपये जमा करण्याची एक प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात जवळपास 1 हजार स्वस्त धान्य दुकाने असतील तर आणि या संख्येचा गुणाकार 3 हजार रुपयांसोबत केला तर एकूण आकडा 30 लाख रुपये होतो. याचे वाटप 60 आणि 40 या टक्केवारीत होणार असल्याचेही माहितगाराने सांगितले. ही जमा करण्याची प्रक्रिया एका स्वस्त धान्य दुकानदाराकडेच आहे असेही माहितगाराने सांगितले. कशासाठी ही 60-40 वाटपाची प्रक्रिया होणार आहे? स्वस्त धान्य दुकानदारांना कांही दंड लावण्यात आला आहे काय? किंवा त्यांनी कांही चुकीचे केले आहे. त्यासाठी हा मोदकांचा प्रकार आहे काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून सुध्दा सापडली नाहीत. पण भारतीय लोकशाहीला जगात प्रगल्भ लोकशाही असे संबोधले जाते आणि या जमा आणि वाटपाचा खेळ पाहिला तर प्रगल्भ असलेली भारतीय लोकशाही आता पुढे नक्कीच रसातळाला जाणार आहे असेच म्हणावे लागेल.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *