ताज्या बातम्या

पोलीसांच्या खाकी वर्दीत लपलेला माणुसकीचा भाव दखल घेण्यासारखा

शिवाजीनगर पोलीसांनी एक युवती आणि तिची एक वर्षाची बालिका नातलगांच्या स्वाधीन केली
नांदेड(प्रतिनिधी)- आपले दररोजचे काम करतांना आम्ही जे कांही करतो त्यामुळे आमचे जीवन योग्य पध्दतीत चालते. पण दररोजच्या कामापेक्षा कांही वेगळे करतांना येणाऱ्या अनंत अडचणी सांभाळूनच ते काम करावे लागते. यालाच माणुसकी असे नाव आहे. असाच एक प्रकार शिवाजीनगर पोलीसांनी एक आठवडाभर सांभाळून आज त्यास पुर्ण विराम दिला तेंव्हा पोलीसांच्या वर्दीमध्ये सुध्दा संवेदनशिल माणुसकी जपली जाते. हे स्पष्टपणे दिसले.
पोलीस विभागावर वेगवेगळ्या पध्दतीने निशाणा साधणे हे जगातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे असे समजले जाते. पोलीसांवर निशाणा साधतांना त्या व्यक्ती आमच्यातूनच पोलीस झाल्या आहेत. याचा विसर आम्हाला पडतो. समाजाची शिकवण घेवून सार्वजनिक ठिकाणी पोलीस म्हणून काम करतांना आम्हाला फक्त त्यांची वर्दी दिसते. त्या वर्दीमागे लटकलेले काटे पाहण्याची आम्हाला कधीच गरज वाटली नाही. त्यामुळे पोलीस आणि जनता यांच्यात दुरावा निर्माण होत राहतो. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीसांची प्रतिमा उंचावण्यासाठी असा शब्द वापरुन अनेक कार्यक्रमांचे नियोजन करतात. त्याचा काय उपयोग होतो. हे काही कधी स्पष्टपणे दिसले नाही. पण आपल्या दररोजच्या काम करण्याच्या पध्दतीतून कांही पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार वेगळ्या पध्दतीचे काम करून आपल्यातील माणुसकी समाजाला दिसेल असे काम करतात. या कामांची दखल घेतली नाही तर आम्ही सुध्दा आमच्या लेखणीसोबत बेईमानी केल्यासारखे होईल.
आच एक दखल घेण्यासारखा प्रकार आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घडला. या बाबतची सविस्तर माहिती अशी की, दि.28 मे रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार लॉकडाऊनच्या काळात रात्रीची गस्त करत असतांना एका मेडीकल दुकानासमोर अंदाजे 20 वर्षीयाची एक युवती एकदम लहान निरागस एक वर्षाच्या बालिकेसोबत रस्त्याच्या कडेला बसलेली दिसली. सर्व पुरूष पोलीस अंमलदार असतांना त्या महिलेशी संपर्क कसा होणार म्हणून रवि वाहुळे यांनी महिला पोलीस अंमलदार मेनका पवार यांना बोलावले. मेनका पवारने त्या 20 वर्षीय युवतीशी संपक र्साधून तिला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा ती काहीच बोलत नव्हती. युवा अवस्थेतील महिला आणि तिची एक वर्षाची बालिका रस्त्यावर सोडून निघून जाणे हे पोलीसांना पटले नाही. म्हणून त्यांनी ती युवती आणि एक वर्षाची बालिका या दोघांना गोकुळनगर भागातील बेघर निवारा येथे सुरक्षीत ठेवले. बेघर निवाराचे संचालक सुनिता आठवले, साई लांडगे यांनी एक-एक दिवस पुढे सरकत होता तसा आपल्या प्रेमाच्या कवळीत त्या महिलेला घेतले तेंव्हा तिचे नाव चांदणी गरवाल रा.बावडी ता.पेटलावाड जि.झाबुवा (मध्यप्रदेश) असे असल्याचे कळले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस अंमलदार माणिक कदम, शिलराज ढवळे, शेख दुराणी, शेख अजहर, विशाल अटकोरे, जानगेवाड आणि एक स्थानिक रहिवासी दिपक पवार यांनी विविध ठिकाणी माहिती घेवून त्या युवतीच्या वडीलांचे नाव नानालाल पुणाजी गरवाल असे असल्याची माहिती मिळवली आणि त्यांचा मोबाईल नंबर सुध्दा प्राप्त केला.
पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांनी नानालाल गरवाल यांच्याशी संपर्क साधून नांदेडमध्ये सापडलेल्या युवतीची माहिती दिली. तेंव्हा आपल्या मुलीची माहिती दिल्याबद्दल नानालाल गरवाल यांचा उर भरून आला. आज दि.3 जून रोजी त्या युवतीचे वडील नानाला गरवाल व इतर नातेवाईक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले कायदेशीर सोपास्कार पुर्ण करून ती युवती आणि तिचे लहान एक वर्षाची बालिका नानालाल गरवाल यांच्या ताब्यात दिली. तेंव्हा त्यांना गहिवरून आले. पोलीस असे सुध्दा करतात काय असा प्रश्न नानालाल गरवाल यांना पडला होता. आनंदाने पोलीसांना आपल्या मुलीचा सांभाळ केल्याबद्दल धन्यवाद देत ती मंडळी पुन्हा आपल्या मध्यप्रदेशाकडे रवाना झाली. ही युवती चांदणी आपल्या घरातून कांहीही न सांगता अंदाजे 22 मे रोजी निघून गेली होती असे नानालाल गरवाल यांनी सांगितले.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आदींनी शिवाजीनगर पोलीसांचे कौतुक केले आहे. जेंव्हा एखादे काम असंभव असे आपल्याला दिसते. फक्त त्या कामाची सुरूवात करणे सुध्दा पुढील यशासाठी कारणीभुत असते हे शिवाजीनगर पोलीसांनी दाखवून दिले आहे. त्यांनी केलेल्या या कामाची दखल आम्ही घेतली नसती तर आम्ही सुध्दा आमच्या लेखणीसोबत बेईमानी केल्यासारखे झाले असते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *